मुंबई । Mumbai
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या दीड तासाच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी अनेक घोषणा केल्या. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून अर्थसंकल्पात या राज्यांना भरभरून दिले. परंतु एकनाथ शिंदे यांनी मोदी सरकारला पाठिंबा देऊनही या बदल्यात महाराष्ट्राला काहीही मिळाले नसल्याचे सांगत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत पायाखाली तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? असा संताप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना व्यक्त केला.
हे देखील वाचा : अर्थमंत्र्यांची युवकांसाठी खुशखबर! पाच वर्षांत १ कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये मिळणार इंटर्नशिपची संधी
वडेट्टीवार काय म्हणाले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळालं -ठेंगा. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेट मध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं?. टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य.. महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल!.
लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आल्याने बिहारमधील नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड आणि आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडूंच्या तेलगु देसम पार्टीच्या समर्थनाने नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळेच बिहार आणि आंध्र प्रदेशला अधिक योजना आणि निधी यंदांच्या अर्थसंकल्पामध्ये मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अर्थसंकल्पापूर्वी अनेकदा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतल्याचं दिसून आलं होतं.
हे देखील वाचा : Budget 2024 : अर्थमंत्र्यांनी तिजोरी उघडली! सर्वसामान्य, शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय?