नागपूर | Nagpur
यंदा हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात नाही पण सभागृहाबाहेर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा वारंवार चर्चेला येत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतंत्र विदर्भासंदर्भात वक्तव्य केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळ्या विदर्भासाठी काम करत असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या या विधानाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील समर्थन दिले होते. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. आता संजय राऊतांच्या विधानावर विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे.
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हायकमांडशी चर्चा करु असे मी म्हणालो होतो
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असं मी म्हणालो होते. आता संजय राऊत कुणाला महत्त्व देत नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तरी कुठं संजय राऊत यांना महत्त्व देतोय आणि महत्त्व देण्याची गरज काय? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. मी वेगळ्या विदर्भाची भूमिका का मांडतोय यामागची भूमिका मांडली आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला म्हणजे न्याय मिळाला असे नाही
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आघाडी असेल तर आमची चर्चा होते. तो निवडणूक लढण्याचा विषय आहे. मात्र एकमेकांना महत्त्व देण्याचा विषय नाही. आमचे वैचारिक मतभेद आहेत. त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. वेगळ्या विदर्भाची भूमिका मी का मांडतोय, याचे कारण आधी सांगितले आहे. विदर्भाला मुख्यमंत्री मिळाला म्हणजे न्याय मिळाला असे नाही. विदर्भाला काय दिले, ७५ हजार कोटींच्या मागणीत विदर्भ कुठे आहे? एकीकडे समतोल विकासाच्या बाता करायच्या आणि विदर्भाला काही द्यायचे नाही. केवळ घोषणा करतात, प्रत्यक्षात काहीच सुरू नाही. आजही विदर्भातील मुलांचे स्थलांतरण सुरू आहे. कामासाठी बाहेर जावे लागते. विदर्भात दरवर्षी ३-४ जिल्ह्यातून लाखभर मजूर आंध्र प्रदेश, तेलंगणात जातो. ११ वर्षाच्या कारकिर्दीत भाजपा सरकारने काय दिवे लावले? त्यामुळे विदर्भाची काय व्यथा आहे हे संजय राऊतांना माहिती नाही असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत काय म्हणाले
विजय वडेट्टीवार अथवा काँग्रेसच्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. याआधीही याच मुद्यावरून आमचा काँग्रेसशी वाद झाला होता. अखंड महाराष्ट्र राहावा यावर काँग्रेसच्या वरिष्ठांची सहमती आहे. म्हणूनच इथे काँग्रेसच्या नेत्यांनी कितीही आपटली तरी विदर्भ वेगळा होणार नाही. हे त्यांचे राजकारण आहे. शिवाय भाजपकडून कितीही प्रयत्न केले गेले तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे राऊतांनी ठणकावून सांगितले. शिवाय आता ठाकरे बंधू मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या भूमिकेवर एकत्र आहेत. त्याच्यामुळे कुणी वेगळ्या विदर्भाचे स्वप्न पाहात असेल तर त्यांचे स्वप्न भंग होईल, असे संजय राऊत यांनी आज सकाळी स्पष्ट केले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




