घोटी । जाकीर शेख Ghoti
इगतपुरी–कसारा घाट परिसरातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या चिंचलेखैरे समूहातील खैरेवाडी येथील बहुचर्चित रस्ता प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी एल्गार कष्टकरी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबई–नाशिक महामार्गावर घोटी टोलनाक्याजवळ रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अडीच तास महामार्ग पूर्णतः ठप्प झाला झाली होती. मुंबई व नाशिक दोन्ही दिशांना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले, तर यंत्रणांचीही चांगलीच दमछाक झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून खैरेवाडी येथील रस्ता प्रश्न प्रलंबित असून, यापूर्वीही या मागणीसाठी विविध आंदोलने झाली आहेत. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नद्या-नाले ओलांडून थेट वाडीत जाऊन समस्या जाणून घेतल्या होत्या. मात्र असे असतानाही हा रस्ता प्रश्न आजतागायत कागदोपत्रीच अडकून राहिला आहे. या दुर्लक्षाविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एल्गार कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
घोटी टोलनाक्याजवळ महामार्गावरच ठिय्या दिल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, तर नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली होती.
यावेळी आंदोलकांनी तीव्र शब्दांत शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “समृद्धी महामार्ग, समृद्धी–वाढवण मार्गासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करते, सिंहस्थासाठी रिंगरोडसारखी मोठी कामे प्राधान्याने घेतली जातात; मग आमच्या दुर्गम आदिवासी भागातील खैरेवाडीच्या रस्त्यासाठी निधी देताना शासनाचा हात आखडता का?” असा सवाल आंदोलकांनी केला. तसेच या रस्त्यासाठी आदिवासी विकास विभागाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आणि रस्ता नसल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनस्थळी तहसीलदार अभिजीत बारवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बैसाणे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता दराडे, विभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे आदी अधिकारी उपस्थित झाले. त्यांनी एल्गार कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांसमवेत संयुक्त बैठक घेऊन खैरेवाडीचा रस्ता प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ठोस ग्वाही तहसीलदारांनी दिल्यानंतर अडीच तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले, आणि वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.
या रास्तारोको आंदोलनात तानाजी कुंदे, सुरेखा मधे, गणपत गावंडा, काळू निरगुडे, मंगल खडके, मथुरा भगत, गणेश सगभोर, राजू धांडे, बाळू उघडे, काशिनाथ शेंडे, सोमनाथ भले, बबन भले, भागीरथ फसाळे, संजय पारधी, तुषार देहाडे, भावडू निरगुडे, हनुमंत सराई, हरिदास आवाली, कांबळे, मंदा भामरे, कल्पेश धांडे, शिवाजी सावंत आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





