घोटी | प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) घोटी खुर्द (Ghoti Khurd) ते सिन्नर घोटी राज्य मार्गावरील कवडदरा (Kavadara) या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यासाठी निधी देऊन हा रस्ता लवकरात लवकर बनवण्यात यावा या मागणीचे निवेदन घोटी खुर्दचे माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून या घोटी खुर्द ते कवडदरा या रस्त्याची दुरवस्था झाली असून घोटी खुर्द पासुन सिन्नर, घोटी, नाशिक येथे जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रवास करतांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असुन या खड्ड्यांमुळे नागरिकांना मनक्याचा व हाडे दुखण्याचा त्रास सुरु झाला आहे.
यापूर्वी या रस्त्याचे काम वैष्णवी इन्फ्रास्ट्रक्चरच्या महाजन या ठेकेदाराने केले होते. परंतु त्यांनी कार्पेट नंतर सिलकोट केलेच नाही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन सुद्धा तत्कालीन अधिकारी श्री आव्हाड यांनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही असा आरोप आत्माराम फोकणे यांनी केला आहे. दुरुस्तीसाठी वारंवार प्रयत्न करूनही अधिकारी दाद देत नाही. रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. यामुळे रस्त्यांवर गुडघाभर चिखल तयार होतो. ग्रामस्थांना चिखलातून जावे लागते.
यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य कमालीचे बिघडून मणक्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. अधिकाऱ्यांचे वाढते दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरवर्षी हीच समस्या गावाच्या पाचवीला पुजलेली असल्याने आता नागरिकांची सहनशिलता संपली आहे. म्हणुन आपण या रस्त्याला आमदार निधी देऊन त्वरीत रस्ता बनवुन द्यावा अशी मागणी केली आहे. या प्रसंगी आत्माराम फोकणे, उत्तम बिन्नोर , रघुनाथ कोकणे, लक्ष्मण फोकणे आदी उपस्थित होते.