अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेतून यंदा जिल्ह्यातील 261 गावांत उपक्रम राबवत सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. दरम्यान, सन 2022 मध्ये 323 व मागील वर्षी (सन 2023) 280 गावांत हा उपक्रम राबविण्यात आला होता. यंदा मात्र यामध्ये घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोले तालुक्यातील अकोले व राजूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक 67 गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. त्याच बरोबरीने संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहर, तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 44 गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली.
गणेशोत्सव काळात गावात गट-तट निर्माण होऊन वाद होतात. त्यातून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गेल्या काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या हद्दीतील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येते. पोलीस ठाण्यामार्फत गावांमध्ये बैठक घेऊन, या योजनेसंदर्भात प्रबोधन करण्यात येते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून ही संकल्पना मागे पडत असल्याने उपक्रम राबविणार्या गावांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीतही यंदा अकोले तालुक्यातील अकोले, राजूर 67 व संगमनेर तालुक्यातील शहर, तालुका, घारगाव व आश्वी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 44 गावांनी हा उपक्रम राबवून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. पारनेर तालुक्यात पारनेर व सुपा पोलीस ठाणे हद्दीतील 33 गावात ही संकल्पना राबवण्यात आली. नेवासा व कर्जत तालुक्यात प्रत्येकी तीन गावातच ही संकल्पना राबवण्यात आली. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात या संकल्पनेला प्रतिसाद मिळत नाही. त्या तुलनेत एक हजार, दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांत ही संकल्पना वाढीस येत आहे.
मंडळाच्या संख्येत वाढ
जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळे व कार्यकर्त्यांनी उत्साहात गणरायांचे स्वागत केले. मात्र, ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेचा प्रतिसाद कमी झाल्याचे चित्र आहे. तर, मंडळांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. जिल्ह्यात 2636 लहान-मोठ्या सार्वजनिक व 113 खासगी गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली. येत्या काळात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातून राजकीय प्रदर्शनही केले जात आहे. त्यामुळेच मंडळांची संख्या वाढून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पेचा प्रतिसाद कमी झाल्याचे चित्र आहे.
पोलीस ठाणेनिहाय गावे
भिंगार 1, पारनेर 20, सुपा 13, नगर तालुका 16, कर्जत 3, श्रीगोंदे 5, बेलवंडी 10, जामखेड 10, खर्डा 2, मिरजगाव 1, शेवगाव 10, पाथर्डी 9, नेवासा 2, शनिशिंगणापूर 1, शिर्डी 1, राहाता 5, लोणी 1, कोपरगाव तालुका 17, कोपरगाव शहर 1, राहुरी 9, श्रीरामपूर शहर 2, श्रीरामपूर तालुका 11, संगमनेर शहर 10, संगमनेर तालुका 19, राजूर 52, अकोले 15, घारगाव 12, आश्वी 3, एकुण 261.