अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांत शेतीसह शेतकर्यांची दाणादाण झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 34 गावांतील शेतकर्यांना अतिवृष्टी, ढगफुटीसद़ृश पावसाचा फटका बसला आहे. या पावसात जिल्ह्यातील 4 लाख 87 हजार 266 शेतकर्यांचे 3 लाख 40 हजार 993 हेक्टरवरील खरीपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात सतत झालेल्या पावसामुळे अडचणी येत असून आज मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असून यात भरपाईबाबत काय निर्णय होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून अतिवृष्टी सुरू आहे. जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले वगळता सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील जवळपास 40 टक्के पिके वाया गेली असून यंदा शेतकर्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवर सर्वाची मदार राहणार आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यासह महसूल विभागाच्या अधिकार्यांची ऑनलाईन व्हीसीद्वारे बैठक घेतली असून नुकसान झालेल्या तालुक्याचा आढावा घेतल असून अतिवृष्टीच्या फटका बसलेल्या भागातील नागरिकांना तातडीने सुविधा देण्यासह पंचनामे यांचा वेग वाढवण्याची सुचना केली आहे. तसेच आज मुंबईत मंत्रीमंडळ कॅबिनेट समितीची बैठक होणार असून यात नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक यांच्याबाबत काय निर्णय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दीड हजारांहून अधिक घरांचे नुकसान
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसात 1 हजार 591 घरांची पडझड झालेली आहे. यासह 18 ठिकाणी जनावरांचे गोठे पडलेले आहेत. तसेच मृत व्यक्तींची संख्या ही सहा झाली असून जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या 4 आहे. 33 मोठी दुधाळ आणि 32 लहान जनावरे मृत्यूमुखी पडले असून 1 लहान ओढकाम करणार्या जनावराचा समावेश आहे. यासह 597 ठिकाणी घरात पूराचे पाणी शिरले होते. पंचनाम्याचा हा आकडा प्राथमिक असून यात वाढ होण्याची शक्यता सुत्रांकडून व्यक्त करण्यात आली.
या शेतकर्यांचे प्रचंड नुकसान
जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील 55 गावांतील 36 हजार 886 शेतकर्यांचे 25 हजार 361 हेक्टरवर, राहुरी 96 गावातील 19 हजार 842 शेतकर्यांचे 12 हजार 133 हेक्टरवर, नेवासा तालुक्यातील 125 गावांतील 40 हजार 857 शेतकर्यांचे 24 हजार 904 हेक्टरवर, शेवगाव तालुक्यातील 113 गावांतील 85 हजार 417 शेतकर्यांचे 58 हजार 655 हेक्टरवर, कोपरगाव तालुक्यातील दोन गावांतील 110 शेतकर्यांचे 30 हेक्टरवर आणि राहाता तालुक्यातील 12 गावांतील 1 हजार 884 शेतकर्यांचे 1 हजार 510, नगर तालुक्यात 106 गावांतील 72 हजार 551 शेतकर्यांचे 62 हजार 700 हेक्टवर, पारनेर 114 गावे, 46 हजार 815 शेतकर्यांचे 24 हजार 261 हेक्टर, पाथर्डी 137 गावांतील 1 लाख 1 हजार 580 शेतकर्यांचे 77 हजार 155 हेक्टरवर, कर्जत 119 गावातील 25 हजार 86 शेतकर्यांचे 16 हजार 58 हेक्टरवर, जामखेड 87 गावांतील 49 हजार 936 शेतकर्यांचे 34 हजार 323 हेक्टरवर, श्रीगोंदा 68 गावांतील 6 हजार 402 शेतकर्यांचे 3 हजार 163 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे आणि क्षेत्राचे जवळपास 40 टक्के पंचनामे झालेले असून सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याला वेग येणार आहे.
बाधित कुटुंबांना प्रत्येकी 23 किलो मोफत धान्य
अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अतिवृष्टी आणि पुरामुळे सलग दोन दिवस बाधित झालेल्या कुटुंबांना 23 किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. यात 20 किलो तांदूळ आणि 3 किलो तूरडाळ दिला जाणार आहे.जिल्हाधिकार्यांनी घोषणापत्र किंवा अधिसूचनेत समावेश असलेल्या बाधित कुटुंबांना हे धान्य मिळणार आहे. राज्याच्या अन्न व धान्य विभागाच्या वतीने याबाबतचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. शासनाच्या 2019 च्या निकषानुसार धान्य वाटपासाठी लाभार्थी निवडी राहणार आहे. या अध्यादेशानुसार प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसीन द्यावे, असे निर्देश होते. या अध्यादेशातील वस्तूंमध्ये बदल करण्यात आला आहे. आता केरोसीन दिले जाणार नाही.
10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ आणि तीन किलो तूरडाळ असे 23 किलो धान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. काही ठिकाणी गहू हा ओलसर झाल्याने त्याऐवजी 10 किलो तांदूळच द्यावे, असे या आदेशात म्हटले आहे. बाधित कुटुंबांना 20 किलो तांदूळ आणि 3 किलो तूरदाळ असे 23 किलो धान्य दिले जाणार आहे. दिवसभरात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी या निकषामध्ये या गावांचा समावेश होता. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी दोन दिवस अतिवृष्टी झाली.
लाभार्थी निवडीचे निकष
सलग दोन दिवस घर हे पुराच्या पाण्याने वेढलेले पाहिजे किंवा सलग दोन दिवस अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंब हे धान्य मिळण्यास पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यात अनेक लहान- मोठ्या नद्यांना अतिवृष्टीमुळे महापूर आले आहेत. नदी काठावरील वाड्या, वस्त्या आणि गावे पूर्ण पुराच्या पाण्याने वाढली गेली आहेत. या गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशा गावातील कुटुंब धान्य मिळण्यासाठी पात्र ठरणार आहेत. बाधित कुटुंबांना त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिपत्याखाली एक हजार 887 स्वस्त धान्य दुकानदार आहेत.
अशी आहेत बाधित गावे
नगर 20, अकोले 1, जामखेड 44, नेवासे 32, पाथर्डी 100, राहुरी 29, संगमनेर 1, श्रीगोंदे 3, श्रीरामपूर 11 आणि राहाता 3 अशा जिल्ह्यातील 313 गावांमध्ये शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत.




