भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.
आपल्या देशातील स्री राज्यकर्त्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या असल्या तरी त्यांचे शौर्य, धैर्य, राजकीय निर्णय, राष्ट्रप्रेम खूप गौरवपूर्ण आणि अभिमानास्पद होते. यामध्ये गौंडची राणी दुर्गावतीचे शौर्य, धाडस, निर्भयता, अस्मिता तेजस्वी सूर्यासारखी होती. पतीच्या मृत्यूनंतर गौंड राज्यावर तिने पंधरा वर्षे राज्य केले. आपल्या राज्याच्या रक्षणासाठी तिने तीनवेळा बलाढ्य मुघलांना पराभूत केले. शेवटच्या युद्धात मात्र मुघलांपुढे नतमस्तक होण्याऐवजी जखमी झाल्यावर स्वतःच्या छातीत खंजीर खुपसून देशासाठी बलिदान दिले. या शूर महिला सेनानीच्या आत्मबलिनाचा दिवस बलिदान दिवस म्हणून आजही देशात साजरा केला जातो.
राणी दुर्गावतीचा जन्म प्रसिद्ध चंडेल राजपूत सम्राट किरत राय यांच्या घराण्यात 5 ऑक्टोबर 1524 रोजी उत्तर प्रदेशातील बांदा येथील चंडेल घराण्याच्या कालिंजर किल्ल्यावर झाला. दुर्गाष्टमीच्या दिवशी जन्म झाला त्यामुळे तिचे नाव दुर्गावती ठेवले. नावाप्रमाणे राणी दुर्गावती तेजस्वी, साहसी, शौर्यवान आणि सुंदर होती. तिचे वडील किरत राय चंडेल घराण्यातील सर्वात शक्तिशाली सदस्य होते. त्यांचा संबंध भारतीय सम्राटांच्या गटाशी होता. त्यांनी महमद गजनीवर युद्धासाठी दबाव आणला. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील खजुराहो या जगप्रसिद्ध शिल्प मंदिराचे निर्माणकर्ते चंडोल घराणे होते. राणी दुर्गावती बालपणापासूनच निर्भय व साहसी होती. तिला तलवारबाजी, धनुर्विद्या याची आवड होती. वडिलांसोबत जंगलामध्ये ती शिकारीसाठी जात असे.घोडेस्वारी आणि रायफल चालवण्यात राणी दुर्गावती निपूण होती. बालपणी आपला जास्तीत जास्त वेळ वडिलांबरोबर घालवी. त्यामुळे त्यांच्याकडून तिला राज्यकारभाराचे ज्ञान प्राप्त झाले. सम्राट किरत राय यांना आपल्या या गुणी कन्येचा खूप अभिमान होता. राणी दुर्गावती वयात आल्यावर त्यांनी राजपूत राजपुत्राचा शोध सुरू केला. परंतु तरुण दुर्गावती गौंड जातीच्या दलपत शाह यांंच्या शौर्याने प्रभावित झाली होती. तिला त्यांच्याशी विवाह करायचा होता. मोठ्या संघर्षानंतर दुर्गावतीचा विवाह राजे दलपत राय यांच्याशी 1542 मध्ये थाटामाटाने झाला. लग्नानंतर गौंड व बुंदेलखंडचे चंडेल राज्य एकत्र आले. राणी दुर्गावतीला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव वीर नारायण ठेवण्यात आले. वीर नारायण अवघा पाच वर्षांचा होता. तेव्हाच राणीच्या पतीचे म्हणजे दलपत शहाचे निधन झाले. राणीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. परंतु राजकुमार आणि राज्यासाठी तिने स्वतःला सावरले. पुत्र वीर नारायण यास गादीवर बसवून राणी राज्यकारभार पाहू लागली. गोंडवणच्या राज्यकारभारास सुरुवात केल्यानंतर राणीने दूरदृष्टीने सर्वात प्रथम आपली राजधानी सिंगौर गड किल्ल्यावरून बिकट पर्वत रांगांमधील चौरंगगड या किल्ल्यावर हलवली. निबिड प्रदेशात राजधानी शत्रूपासून सुरक्षित राहून आपले वर्चस्व राहील हा हेतू होता. राणी शिक्षणाची समर्थक होती. आपल्या राज्याच्या सुसज्ज सैन्यनिर्मितीसाठी राणीने मोठे काम केले. सैन्याचे व्यवस्थापन स्वतःच्या मार्गदर्शनाखाली करून प्रशिक्षित सैन्य निर्माण केले. तिच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गौंड राज्याचे उत्तम व्यवस्थापन सुरू होते. राणीने राज्यात अनेक मंदिरे, वास्तू, धर्मशाळा उभारल्या. तिच्या राज्यकाळात राज्याला शांतता व समृद्धी लाभली.
1556 मध्ये माळवावर ताबा असलेल्या सुजात खानाने राणी दुर्गावतीच्या राज्यावर आक्रमण केले. त्याला वाटले राणी अबला स्री आहे. तिचे राज्य आपण लवकरच ताब्यात घेऊ. परंतु राणीने त्याच्यासहित त्याच्या विचारांनाही युद्धात पराभूत करत मातीत लोळवले. या विजयाबद्दल प्रजाजनांनी राणीचा मोठा सन्मान केला. राणीच्या राज्यात इतकी सुबत्ता होती की असे म्हटले जाते की, तिची प्रजाही सोन्याच्या नाण्यात व्यवहार करत असे. राणी दुर्गावतीने पंधरा वर्षे गौंड राज्यावर राज्य केले.
अकबराच्या अधिपत्याखाली गौंड राज्याच्या सीमेलगत कारभार करत असलेल्या सुभेदाराची नजर दुर्गावतीच्या राज्याकडे वळाली. रिवा आणि माळवा येथील मुघल सरदार असफ खानाने अकबराला वारंवार राणी दुर्गावती विरुद्ध भडकवले. राणी दुर्गावतीने आपले मांडलिकत्व स्वीकारावे, असा निरोप अकबराने तिला पाठवला. परंतु तो तिने धुडकावून लावला. त्यानंतर अकबराने राणीकडे तिचा पाळीव हत्ती सरमन आणि विश्वासू सल्लागार वजीर आधार सिंग याची मागणी केली, अन्यथा युद्धास तयार राहण्यास सांगितले.अकबराची ही मागणी राणीने धुडकावून लावली. अकबराने असफ खानास राणी दुर्गावतीवर हल्ला करण्याची आज्ञा केली. असफ खानाने 1562 मध्ये राणी दुर्गावतीच्या मांडला प्रांतावर आक्रमण केले. राणीचे राज्य प्राप्त करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. मुघलांच्या सामर्थ्यापुढे राणी दुर्गावतीचे सैन्य सामर्थ्य अगदी क्षुल्लक होते. तरीही राणीने राज्याचे रक्षण करण्याच्या निश्चय केला. दरबारातील अनेक सरदारांनी राणीला समजावण्याचा प्रयत्न केला की, अकबराशी टक्कर घेणे म्हणजे कपाळमोक्ष करण्यासारखे आहे. तेव्हा राणी दुर्गावतीने ठामपणे सांगितले की, अपमानाचे, गुलामीचे जीवन जगण्यापेक्षा सन्मानाचे मरण पत्करणे, युद्धात लढताना वीरगती प्राप्त होणे केव्हाही चांगले.
राणी दुर्गावती आणि मुघलांचे सैन्य यांच्यात युद्धाला तोंड फुटले. हे असमान युद्ध होते. एका बाजूला अगदी मोजके युद्ध आणि अल्प युद्धसामुग्री होती तर दुसर्या बाजूला मुघलांचे अधिक प्रगत असे शस्त्रास्त्रसंपन्न, प्रशिक्षित सैनिक होते. राणीने ओळखले समोरासमोर युद्ध करून आपण जिंकू शकणार नाही. तिने गनिमी काव्याने या बलाढ्य मुघल सैन्याशी लढा देण्याचे ठरवले. जबलपूर जिल्ह्यात जिथे एका बाजूला पर्वतरांगा तर दुसर्या बाजूला नर्मदा आणि गौर नद्या वाहत आहेत अशा क्षेत्रात राणीने प्रचंड मुघल सैन्याला युद्धात गुंतवून ठेवले. त्यामुळे मुगल सैन्य हैराण झाले. रंजीस झाले. या युद्धात राणी दुर्गावतीचा सेनापती अर्जुन दास मारला गेला. तेव्हा राणीने युद्धाचे नेतृत्व स्वतःकडे घेतले. या युद्धात राणी दुर्गावतीचा विजय झाला. मुघल सैनिकांचा पाठलाग करत त्यांना पलायन करण्यास लावले.
दोन वर्षांनी 1565 मध्ये असफ खानाने पुन्हा नव्या जोमाने राणी दुर्गावतीच्या राज्यावर हल्ला केला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ अशी राणीची योजना होती. परंतु रात्र युद्धाची कल्पना राणीच्या दरबारातील सरदारांनी नाकारली. असफ खानच्या सैन्याने पहाटेच दौंडच्या सैन्यावर शस्त्र रोखले. आपला आवडता हत्ती सरमनच्या पाठीवर हौदात बसून राणी स्वतः युद्धात उतरली. या युद्धात राणी दुर्गावतीचा मुलगा वीर नारायण शत्रू विरुद्ध शौर्याने युद्ध लढले. तीनवेळा राणीने मुघलांच्या सैन्याला धूळ चारून अकबराला पराभव पत्करायला लावला होता. परंतु या युद्धात मुलगा वीर नारायण गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश राणीने आपल्या सैनिकांना दिले आणि ती मुघल सैन्याशी दोन हात करण्यात गुंतून गेली. या घमासान युद्धात राणी दुर्गावतीच्या मानेत एक बाण घुसला. राणीची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर राणीच्या लक्षात आले की या युद्धात आपण जिंकू शकणार नाही. राणीच्या सेनापतीने आग्रह केला की आपण इथून काहीकाळासाठी माघार घेऊन सुरक्षित ठिकाणी जाऊन राहू. परंतु रणांगणातून भ्याडासारखे पळणे किंवा शत्रूच्या हाताने मरणे राणी दुर्गावतीला मान्य नव्हते. तिने आपल्या सैनिकाला तिला ठार मारण्याचा आदेश दिला; परंतु आपल्याच राणीला मारण्यास सैनिकांनी नकार दिला. तेव्हा राणीने कमरेचा खंजीर उपसला आणि स्वतःच्या छातीत खुपसून आपले जीवन संपवले. मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूसमोर वीर राणी दुर्गावतीने एकदाही माघार घेतली नाही. राणीच्या युद्धाच्या, शौर्याच्या गाथा आजही गायल्या जातात.