कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
गेल्या चाळीस वर्षांत आमच्या कोणत्याही स्वीय सहाय्यकाने पोलिसांवर हल्ला केला नाही, अशा शब्दात युवानेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर जोरदार टीका केली. कोपरगाव मतदारसंघात वाढलेल्या गुन्हेगारीतून नुकत्याच झालेल्या घटनेत आमदारांच्या स्वीय सहाय्यकाने पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप करत विवेक कोल्हे यांनी आमदार काळेंना आपल्या स्वीय सहाय्यकाला पोलिसांकडे हजर करण्याचे खुले आवाहन केले. सहकार महर्षी कोल्हे कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगावात सुरू असलेला गुन्हेगारीचा सुळसुळाट कोणत्या आकाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदारांच्या स्वीय सहाय्यकावर झालेल्या गुन्हा दाखल प्रकरणी ते म्हणाले, यापूर्वीही गोळीबार आणि अवैध धंद्यांशी आमदारांचे निकटवर्ती संबंधित असल्याचे समोर आले आहे. नवरात्रीसारख्या पवित्र उत्सवात असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी आमदार रात्री प्रयत्न करतात, तर पीएला वाचवण्यासाठीही धडपड करतात. मात्र, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनी दर्शना पवार यांच्या खून प्रकरणात त्यांना सांत्वनाचा शब्द काढता आला नाही, अशी टीका त्यांनी केली.
आमदार काळेंनी केलेल्या उपकाराची टिप्पणीवर पलटवार करताना विवेक म्हणाले, महायुतीचा धर्म पाळत कोपरगाव मतदारसंघात विधानसभेला सर्वात कमी मतांपैकी एक असणार्या आमदारातून सर्वाधिक मते मिळवणार्या पहिल्या पाचमध्ये आ. काळे कोणामुळे पोहोचले, हे ते विसरले आहेत. एकदा वेळ निघून गेल्यावर त्यांची भाषा बदलली आहे. ते गेल्या 16 वर्षांपासून तुम्ही सत्तेत असूनही जनतेला निकृष्ट रस्ते, अवैध धंदे, भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्या उपकाराची परतफेड अशा कारभाराने करत असाल, तर जनता योग्य वेळी त्याचे परिणाम दाखवेल.
आपल्या काळात केलेल्या कामांचा उल्लेख करताना विवेक म्हणाले की, त्यांच्या सत्ताकाळात जनतेसाठी मैदानात उतरून आंदोलने केली, धरणे दिली. वीज, पाणी, रस्ते, सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर भरीव काम केले. याचे जनता साक्षीदार आहे. स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या काळात राज्याचे बजेट 25 हजार कोटी होते आणि आता ते सात लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे. पूर्वी आमदारांना मिळणारा निधी कमी होता, तो आता वार्षिक पाच कोटींपर्यंत गेला आहे, असे सांगत त्यांनी विकासकामांसाठी निधीची कमतरता नसल्याचे सूचित केले. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, कोल्हे कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.





