कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
गेल्या चार वर्षांत पालिकेची निवडणूक झालेली नाही. या काळात आमदार आणि मुख्याधिकारी हे पालिकेचे काम करत आहेत. आमदार एकटेच कामे सांगतात आणि मुख्याधिकारी ती करतात. गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही कोपरगाव वासीयांचा हिरमोड झाला असून शहरातील रस्ते अद्याप खड्डे आणि धूळयुक्त आहेत. त्यामुळे आमदार कोपरगाव शहराच्या विकासात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विवेक कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर केली आहे.
शनिवारी संजीवनी कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केशव भवर, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, राजेंद्र शिंदे, नारायण अग्रवाल, अरुण येवले, राजेंद्र बागुल, मच्छिंद्र केकाण, शरद थोरात आदी उपस्थित होते. विवेक कोल्हे पुढे म्हणाले, शहरातील 72 किमी रस्ते असून त्यासाठी 70 कोटी रुपये खर्च झाले आहेत तर काही रस्ते प्रस्तावित आहेत. मात्र तरीही शहरातील रस्ते खड्डेमय आहेत आणि शहरात धुळही मोठ्या प्रमाणात आहे. जर कोणी या विरोधात आंदोलन केले तर आमदार काळे यांचे गुंड त्या आंदोलकांवर धावून जातात आणि दडपशाही करतात. गेल्या चार व त्या आधीच्या पाच वर्षांत कोपरगाव शहरात काहीच काम झालेले नाही. आमदारांनी मागील पाच व आताच्या टर्ममध्ये काहीही केलेले नाही. त्यामुळे पालिकेची देणगी वाढली असून ठेवी फक्त 3 लाख रुपयांच्या राहिल्या आहेत.
11 हजार ते 14 हजार ब्रास प्रमाणे पेव्हर ब्लॉकची बिले निघाली आहेत. मात्र त्या कामांसाठी प्रत्यक्षात 7 हजार रुपये ब्रास प्रमाणे खर्च लागतो. यात देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाचे बंगले बांधले गेले की काय, असा सवाल विवेक कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. आ. काळे यांनी निवडणुकीपूर्वी अनेक समाजांना समाज मंदिराचे पैसे देत असल्याचे जाहीर केले, मात्र अद्याप दोन समाज सोडले तर कोणालाही निधी मिळालेला नाही. तर पाणी पुरवठा योजनेवर 125 ते 150 कोटी रुपये खर्च केला आहे. तरीही शहराला वर्षात 50-60 दिवस अस्वच्छ पाणी मिळत आहे. सार्वजनिक शौचालयांची साफसफाई आणि औषध फवारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे, मात्र ते केल्याचे कुठेही दिसत नाही.
मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी प्रति जनावर 120 रुपये दराने एक महिन्यात पालिकेने 180 मृत जनावरांची विल्हेवाट लावली आहे असे आकडे आहेत. तर चार वर्षांत 7-8 हजार मृत जनावरांची विल्हेवाट लावली की काय? यामध्ये देखील लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे दिसत आहे. कोपरगावात रेशन घोटाळा उघड करणार्यावर गोळीबार झाला. त्यात आमदाराच्या स्वीय सहाय्यकावर आरोप झाले, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्या स्वीय सहाय्यकाची मजल पोलिसांना मारण्यापर्यंत गेली. तो आरोपी एक महिना फरार होता आणि त्याने नवरात्रीत शहराचे वातावरण दूषित केले व महिलांना बेटात देवीला जाता आले नाही. आमदार आणि मुख्य अधिकार्यांनी शहराची व जनतेची फसवणूक केली असल्याचेही विवेक कोल्हे शेवटी म्हटले आहे.




