मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या याबाबत हरकती आणि सूचना मतदार दाखल करू शकतात.




