Monday, November 25, 2024
Homeनगर30 ऑगस्टपर्यंत मतदान यंत्र होणार सज्ज

30 ऑगस्टपर्यंत मतदान यंत्र होणार सज्ज

60 टक्के तपाासणी पूर्ण || विभागीय आयुक्तांकडून मतदार यादी पुनरिक्षणाचा आढावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदान यंत्राची पुर्तता झालेली आहे. सध्या एमआयडीसीच्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये युध्द पातळीवर आवश्यक असणार्‍या मतदान यंत्रे (बीयू, सीयू आणि व्हीव्ही पॅट) यांची तपासणी सुरू आहे. सोमवार (दि.19) पर्यंत जिल्ह्यासाठी आवश्यक असणार्‍या मतदान यंत्रापैकी सुमारे 60 टक्के मतदान यंत्रे तपासून झालेली असून येत्या 31 ऑगस्टपर्यंत मतदान यंत्राची तपासणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून आल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, सामेवारी 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागातील राजकीय पक्षांसमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी नवीन मतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनासह राजकीय पक्षांना केले.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी शाहू मोरे, तहसिलदार प्रदीप पाटील हे तर दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ गेडाम म्हणाले, मतदार यादी अधिक अचुक व पारदर्शक होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रतिनिधींची नेमणुक करावी. बैठकीत उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सूचना केल्या.

दरम्यान, नगरच्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये जिल्ह्यासाठी आवश्यक मतदान यंत्रे उपलब्ध झाली आहेत. नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी आणि नगर दक्षिण मतदारसंघासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रापैकी न्यायालयीन प्रक्रियेमुळे नगर दक्षिणेची यंत्रे सील बंद आहेत. यामुळे जिल्ह्याला विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी सुमारे साडे पाच हजार बीयू, सीयू आणि व्हीव्ही पॅट नाशिकवरून मागवण्यात आलेले आहे. यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अशा प्रकारे 18 हजार 476 बीयू, सीयू आणि व्हीव्ही पॅट यांची तपासणी करण्यात येत असून यापैकी 10 हजार 778 बीयू, सीयू आणि व्हीव्ही पॅट यांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. या कामात जिल्हा निवडणूक विभागासह महसूल, जिल्हा परिषद यासह सर्व शासकीय विभागातील मिळून 150 ते 200 अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्या मार्फत मतदान यंत्रे विधानसभेसाठी सज्ज करण्यात येत आहे.

उपलब्ध आणि कंसात तपासणी झालेले यंत्रे
बीयू 8 हजार 542 (4 हजार 199), सीयू 4 हजार 779 (3 हजार 278), व्हीव्ही पॅट 5 हजार 155 (3 हजार 351) असे आहेत. यासह नाशिकवरून 2 हजार 793 बीयू, 1 हजार 284 सीयू आणि 1 हजार 358 व्हीव्ही पॅट उपलब्ध झालेली आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या