मुंबई | प्रतिनिधी Mumbai
स्थानिक राजकारणावरील पकड कायम ठेवण्याच्या इर्षेने राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. अनेक वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असल्याने मतदानासाठी मतदारांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे यंदा महापालिका निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या निवडणुकीची मतमोजणी हाती घेऊन निकाल जाहीर केले जातील.
२९ महापालिकांमधील २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता २ हजार ८०१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या जागांसाठी एकूण १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात असून त्यात मुंबईतील १ हजार ७०० उमेदवारांचा समावेश आहे. राज्यातील ३ कोटीहून अधिक मतदार आज या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद करतील. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल.
महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. संबंधित निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आज संध्याकाळपर्यंत मतदानाचे साहित्य देण्यात आले. मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार पात्र असून त्यासाठी सुमारे ३९ हजार ९२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे १० हजार १११ मतदान केंद्रांसाठी ११ हजार ३४९ कंट्रोल युनिट आणि २२ हजार ६९८ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे.
बहुसदस्यीय पद्धत
मुंबई वगळता अन्य २८ महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. मुंबई महापालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार या २८ महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला किमान ३ ते ५ मते देणे बंधनकारक असेल.
दुबार मतदारांबाबत दक्षता
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.
३ हजार १९६ संवेदनशील मतदान केंद्रे
आज मतदान होत असलेल्या २९ महापालिकांसाठी एकूण ३९ हजार ९२ मतदान केंद्रे असून यापैकी ३ हजार ९१६ मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ९९७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांपैकी वसई -विरारमध्ये सर्वात कमी म्हणजे ३७ केंद्रे आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर क्षेत्रात एकही संवेदशील मतदान केंद्र नाही. नाशिकमध्ये २६६, मालेगावमध्ये २४७ धुळ्यात १२९ तर जळगावमध्ये १६७ मतदान केंद्रे संवेदशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
‘मताधिकार’ मोबाईल अॅप
मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. या अॅपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (ईपीआयसी) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल. याच अॅपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्राचे ठिकाणही कळू शकेल. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवाराविषयी अधिक माहितीदेखील जाणून घेता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून अॅपप्रमाणे ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (ईपीआयसी) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी प्राधान्य
मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पुरती सुविधा उभारली असून व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध असेल.
पिंक मतदान केंद्र
महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी महिला असतील. असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल.
निवडणूक होत असलेल्या महापालिका आणि मुदत संपल्याची दिनांक
छत्रपती संभाजीनगर : २७ एप्रिल २०२०, नवी मुंबई: ७ मे २०२०, वसई- विरार : २८ जून २०२०, कल्याण- डोंबिवली : १० नोव्हेंबर २०२०, कोल्हापूर : १५ नोव्हेंबर २०२०, नागपूर : ४ मार्च २०२२, मुंबई : ७ मार्च २०२२, सोलापूर: ७ मार्च २०२२, अमरावती : ८ मार्च २०२२, अकोला : ८ मार्च २०२२, नाशिक : १३ मार्च २०२२, पिंपरी- चिंचवड : १३ मार्च २०२२, पुणे : १४ मार्च २०२२, उल्हासनगर : ४ एप्रिल २०२२, ठाणे : ५ एप्रिल २०२२, चंद्रपूर : २९ एप्रिल २०२२, परभणी : १५ मे २०२२, लातूर : २१ मे २०२२, भिवंडी-निजामपूर : ८ जून २०२२, मालेगाव : १३ जून२०२२, पनवेल : ९ जुलै २०२२, मीरा-भाईंदर : २७ ऑगस्ट२०२२, नांदेड-वाघाळा : ३१ ऑक्टोबर २०२२, सांगली-मीरज-कुपवाड : १९ ऑगस्ट २०२३, जळगाव : १७ सप्टेंबर २०२३, अहिल्यानगर : २७ डिसेंबर २०२३, धुळे : ३० डिसेंबर २०२३, जालना : नवनिर्मित आणि इचलकरंजी : नवनिर्मित
मतदार आणि मतदान केंद्र
पुरुष मतदार : १ कोटी ८१ लाख ९३ हजार ६६६
महिला मतदार : १ कोटी ६६ लाख ७९ हजार ७५५
इतर मतदार : ४ हजार ५९६
एकूण मतदार : ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७
मतदानाची वेळ : सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
एकूण मतदान केंद्र : ३९ हजार ९२
जागा आणि आरक्षित जागा
महानगरपालिकांची संख्या : २९
एकूण प्रभाग : ८९३ आणि एकूण जागा : २ हजार ८०१
महिलांसाठी जागा : १ हजार ४४२
अनुसूचित जातींसाठी जागा : ३४१
अनुसूचित जमातींसाठी जागा : ७७
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा : ७५९




