राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
तालुक्यातील वाकडी येथील गोविंदनगर येथील प्राथमिक शाळेच्या खिडकीची काच अज्ञात इसामाने फोडली. यामुळे पालक व स्थानिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे. या इसमाचा शोध लावून त्यावर कडक कारवाईची मागणी पालकांतून होत आहे.
वाकडीच्या गोविंदनगर जि. प. शाळेत 1 ते 4 थी पर्यंत वर्ग भरतात. मागील 15 दिवसात या शाळेची खिडकीची काच अज्ञात इसमाने फोडली. या घटनेनंतर दि. 17 च्या रात्री पुन्हा दुसरी काच देखील फोडली. यामुळे पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही शाळा रहिवाशी वस्ती पासून काही अंतरावर आहे. आजुबाजुला शेती आहे. पंधरा दिवसात ही दुसरी घटना आहे.
सुरेश जाधव म्हणाले, येथे विद्यार्थी घडले जातात. येथून मागे आजुबाजुच्या विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करत गावातील शाळेत शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असे. परंतु जि.प. ने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वर्ग सुरु केले. यासाठी स्थानिकांनी जागा उपलब्ध करुन दिली. परंतु या स्वरुपाची घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. या शाळेत 4 ते 5 वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षण घेतात. याबाबत ठोस कारवाई करावी लागणार आहे. जेणे करुन भविष्यात अशा घटना होऊ नये व विद्यार्थी दहशती खाली वावरू नये याबाबत गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी देखील यात लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी पालकांनी तसेच शालेय व्यवस्थापन समितीने केली.