Monday, June 17, 2024
Homeनगरभिंतीवरील घड्याळे खरेदीची चौकशी गुलदस्त्यात

भिंतीवरील घड्याळे खरेदीची चौकशी गुलदस्त्यात

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

- Advertisement -

शिक्षक बँक शताब्दी वर्षानिमित्त संचालक मंडळाने सभासदांना भिंतीवरचे घड्याळ भेट दिले. त्याची अवाजवी किंमत लावल्याचे लक्षात येताच गुरुकुलने या कारभाराची तक्रार जिल्हा उपनिबंधाकडे केली. यातील तथ्य लक्षात आल्याने निबंधकांनी चौकशी अधिकार्‍याची नेमणूक केली. परंतु महिना उलटला तरी चौकशी अधिकारी बँकेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे चौकशी अधिकार्‍यांच्या घरातील भिंतीवर शिक्षक बँकेची घड्याळ पोहोचली काय, अशी शंका गुरुकुल मंडळाने व्यक्त केली आहे.

रावसाहेब रोहकले अध्यक्ष असताना त्यांनी बँकेच्या शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली. विकास मंडळाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी नियम धाब्यावर बसवून याच निधीतून खर्च केला. रोहोकले सेवानिवृत्त झाल्यानंतर इतर संचालकांनीही सभासदांच्या भावनेचा विचार न करता या रकमेचा अवाजवी खर्च चालूच ठेवला.

संचालकांमध्ये कल्पकतेची दिवाळखोरी असल्याने काय वस्तू सभासदांना भेट द्यावी, याचेही भान त्यांना राहिले नाही. पती-पत्नी सेवेत असलेल्या शिक्षकांना दोन घड्याळे घेऊन नेमके काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. गुरुकुलने पूर्वीच या भेटवस्तूवर बहिष्कार घातला आहे.

या गैरव्यवहाराची त्वरित चौकशी व्हावी, त्यात विरोधकांची मते नोंदवावीत अशी मागणी शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, रा. या. औटी, संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, वृषाली कडलग, राजेंद्र ठाणगे, बापू लहामटे, दशरथ देशमुख, इमाम सय्यद, राजेंद्र पट्टेकर, सीताराम सावंत, विजय काकडे, भास्कर नरसाळे, संजय नळे, सुखदेव मोहिते, मिलिंद पोटे, रघुनाथ लबडे, संभाजी औटी, संतोष डमाळे यांनी केली आहे.

कर्जावरील व्याजदर कमी करण्याबाबत गुरुकुलच्या भावना तीव्र आहेत. कायम ठेवीवर दरवर्षी देण्यात येणारा आकडा निश्चित करून बँकेने चूक केली आहे. ठेवीवर वर्षातून एकदाच व्याज मिळते. कर्जदाराला मात्र, महिन्याला व्याज भरावे लागते. ठेवीदार बँकेकडून पैसे घेतो तर कर्जदार बँकेला नफा देतो. शिवाय तो गरजवंत असतो. त्यामुळे संचालकांनी तातडीने कर्जावरील व्याजदर कमी करावे, अशी मागणी शिक्षक नेते डॉ. कळमकर यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या