भारताने आता संरक्षण विभागासाठी अधिक तरतूद केली आहे. भारताचा खरा शत्रू चीन आहे आणि त्याने भारताची चोहोबाजूंनी कोंडी करायचे ठरवले आहे. दक्षिण आशियात आता भारताचा एकही खास भरवशाचा मित्र उरला नसल्याने नवी व्यूहनीती अवलंबावी लागणार आहे. त्यामुळे ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या वापराबरोबरच आता युद्ध झाल्यास महामार्गांचा वापर करण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे सामरिक पाऊल भारताने उचलले आहे.
भारताने आता संरक्षण विभागासाठी अधिक तरतूद केली आहे. भारताचा खरा शत्रू चीन आहे आणि त्याने भारताची चोहोबाजूंनी कोंडी करायचे ठरवले आहे. दक्षिण आशियात आता भारताचा एकही खास भरवशाचा मित्र उरला नसल्याने नवी व्यूहनीती अवलंबावी लागणार आहे. त्यामुळे ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या वापराबरोबरच आता युद्ध झाल्यास महामार्गांचा वापर करण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे सामरिक पाऊल भारताने उचलले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये चीनच्या युद्धखोर वृत्तीमुळे भारतालाही मनात असो वा नसो, शस्त्रसज्ज व्हावे लागत आहे. प्रत्येक देश स्वत:ला युद्धासाठी कसे सज्ज ठेवता येईल, याचा विचार करताना दिसतो. त्यातल्या त्यात चीनच्या आसपास असलेली बहुतेक राष्ट्रे त्या देशाच्या विस्तारवादामुळे आणि युद्धखोरीमुळे त्रस्त दिसतात. चीनच्या युद्धविषयक आणि शस्त्रसज्जतेच्या अनुषंगाने केलेल्या तयारी आणि सातत्यपूर्ण संशोधनामुळे अनेक देशांपुढील चीनचे अव्हान वाढत आहे. भारतालाही चीनच्या आव्हानामुळे सतत युद्धसज्ज राहणे आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर देशात अत्यावश्यक परिस्थितीमध्ये लढाऊ विमाने महामार्ग तसेच एक्स्प्रेस हायवेवर उतरवणे महत्त्वाचे ठरत आहे. त्यादृष्टीने देशात काही लक्षवेधी प्रयोग होत आहेत.
युद्धात तीनही दलांचे योगदान महत्त्वाचे असते. त्यासाठी पायाभूत सुविधा उभाराव्या लागतात. आतापर्यंत रस्त्यांचा वापर केवळ वाहतुकीसाठी केला जायचा. लष्कराच्या वेगवान हालचालींसाठी चांगले रस्ते आवश्यक असतात; परंतु आता आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यांचा वापर हवाई पट्ट्यांसारखा करता आला पाहिजे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने पूर्वांचल द्रुतगती मार्गाची आखणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे अलीकडेच लोकार्पण करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाने पूर्वांचल द्रुतगती मार्गावरून टेक ऑफ करून अलीकडेच आपली ताकद दाखवली आहे. 30हून अधिक लढाऊ विमानांनी कसरती केल्या. याअंतर्गत 3.2 किलोमीटर लांबीच्या हवाईपट्टीवर सी-130 जे हरक्यूलीस विमानाच्या लँडिंगनंतर इतर विमानांनी ‘टच अॅण्ड गो’ ऑपरेशन केले.
या एअर शोने जगाला संदेश देत भारताने सामरिकदृष्ट्या एक महत्त्वाचे पाऊल टाकून आपली ताकद दाखवली आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन आघाड्यांवर युद्ध झाल्यास एक्स्प्रेस वे महत्त्वाची भूमिका बजावेल. उत्तर आणि पूर्व सीमेजवळ असल्याने इथून दोन्ही आघाड्यांवर लढाऊ विमाने सहज चालवता येतात. एअरफोर्सची सुखोई-30 एमआयके, राफेल, सी 130 जे सुपर हर्क्यूलससारखी विमाने आता पूर्वांचल एक्स्प्रेसच्या हवाईपट्टीवर उतरू आणि टेक ऑफ करू शकतील. पूर्व आघाडीवर चीनविरुद्धच्या युद्धादरम्यान आणीबाणीसाठी वापरण्यात येणारा हा पहिलाच द्रुतगती मार्ग असेल. पूर्व द्रुतगती मार्गावरून दोन्ही आघाड्यांपर्यंतचे अंतर सुमारे सहाशे किलोमीटर आहे. त्यामुळे दोन-तीन तासात तयारी करून बालाकोटसारखा हल्ला सहज करता येतो. अशा लढाऊ ऑपरेशनमध्ये प्रतिसादाची वेळ फक्त दोन ते तीन तास असेल.
डोकलाम वादानंतर चीनने शिनजियांग प्रांत आणि तिबेट भागात 16 एअरबेस बांधले आहेत. यामध्ये 14 हजार फूट उंचीवर उभारलेला अली गुंसा, बुरंग, ताजंग यांसारख्या मोठ्या तळांचा समावेश आहे. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे लक्ष्यावर आदळताच पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील सुलतानपूरजवळ लढाऊ कारवाई सुरू करणे हवाई दलाला सोपे होईल. हवाई दलाच्या ‘प्लॅन बी’अंतर्गत एअरबेस नष्ट झाल्यास हा एक्स्प्रेस वे युद्धकाळात वापरला जाईल; परंतु शांततेच्या काळात, भारत आपली सामरिक ताकद दाखवण्यासाठी या हवाईपट्टीवर 30 हून अधिक विमाने उतरवली गेली आहेत. इथे ‘टच अॅण्ड गो’ ऑपरेशन सतत चालू राहील, जेणेकरून चीनसह पाकिस्तानला भारताच्या हवाई शक्तीचा अंदाज येईल.
विमान चालनात, टच-अॅण्ड-गो लँडिंग म्हणजेच टीजीएल किंवा सर्किट ही एक युक्ती वापरली जाते. त्यात धावपट्टीवर उतरणे आणि न थांबता पुन्हा उड्डाण करणे अपेक्षित असते. सामान्यतः वैमानिक नंतर सर्किट म्हणून ओळखल्या जाणार्या परिभाषित पॅटर्नमध्ये विमानतळावर फिरतो आणि पुन्हा उड्डाण करतो. यामुळे कमी वेळेत अनेक लँडिंगचा सराव करता येतो. वैमानिकाने विमान उड्डाण करण्यापूर्वी थांबवले तर त्याला त्याला ‘थांबा आणि जा’ असे म्हणतात. विमानाची चाके जमिनीला स्पर्श करत नसतील तर त्याला ‘लो पास’ असे म्हणतात. टच-अॅण्ड-गो लँडिंग आणि लो पास हे दोन्ही प्रकार ‘गो-अराऊंड’ पद्धतीची आहेत. अनियोजित टच-अॅण्ड-गो लँडिंगला रिजेक्टेड लँडिंग किंवा बाल्क्ड लँडिंग असेही म्हणतात. एखादे विमान पूर्ण थांबण्यासाठी पुरेशी जागा नसते परंतु वेग वाढवण्यासाठी आणि पुन्हा उड्डाण करण्यासाठी पुरेशी जागा असते तेव्हा टच-अॅण्ड-गो लँडिंग महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. ताज्या अनुभवामुळे लवकरच इतर मोठ्या एक्स्प्रेस वेच्या धावपट्टीवर लढाऊ विमाने उतरवता येतील. भारताने उत्तराखंडव्यतिरिक्त विशेषतः ईशान्येकडील भागात अशी तयारी पूर्ण केली आहे. रविवारी हवाई पट्टीवर उतरल्यानंतर हर्क्यूलस विमानाची चाचणी घेण्यात आली. या द्रुतगती मार्गाचे वैशिष्ट्य काय आणि त्याचे महत्त्व काय आहे, हेही इथे समजून घ्यायला हवे. अयोध्या सुलतानपूरला लागून आहे. काशी सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्व आणि उत्तर एअरबेस जवळ आहेत. नेपाळची सीमा पूर्वांचल एक्स्प्रेस वेच्या हवाई पट्टीजवळ आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर अलीकडे या भागात लढाऊ विमानांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यादरम्यान सुखोई आणि मिराज विमाने हवाईपट्टीवर उतरवण्यात आली. सीमेजवळील भारतमाला प्रकल्पाच्या महामार्गावर बारमेर आणि जैसलमेरदरम्यान तसेच फलोदी ते जैसलमेरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर हवाईपट्टी बनवण्यासाठी जमीन निश्चित करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधला बिजबेहारा चिनार बाग राष्ट्रीय महामार्ग, उत्तराखंडमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील रामपूर-काठगोदाम महामार्ग, चीन तसेच बांगलादेश सीमेजवळील पश्चिम बंगालमधला खरगपूर कंजर महामार्ग, आसामचा मोहनबारी-तिनसुकिया महामार्ग आदी 12 ठिकाणी नव्याने हवाई पट्ट्या बांधण्यात येणार आहेत. लष्करी विमानांच्या लँडिंगसाठी महामार्गावर पट्ट्या किंवा रस्त्यावर खास धावपट्ट्या तयार केल्या जातात. आपत्कालीन परिस्थितीत या धावपट्टीचे लष्करी हवाई तळांमध्ये रूपांतर केले जाते. युद्ध झाल्यास एअरबेस पूर्णपणे नष्ट झाल्यानंतरच इथून विमाने चालतात. दुसर्या महायुद्घाच्या काळात विमानांच्या लँडिंगसाठी मोटारवेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. त्यावेळी जगात रस्त्यावरची पहिली धावपट्टी बांधण्यात आली होती. आता पुन्हा जग त्याच मार्गावरून चालले आहे. महामार्गाची पट्टी साधारणपणे दोन ते साडेतीन किलोमीटर लांब असते. महामार्गाची पट्टी अधिक जाडीची असून तिचा पाया घन काँक्रिटचा असतो. एअरबेससाठी वापरण्याच्या वेळी, त्याच्या जवळ एअरफिल्ड तयार केले जाते. विमान उतरण्यासाठी लागणारी जागा कोटोबार प्रणालीद्वारे नियंत्रित केली जाते.
2015 मध्ये यमुना एक्स्प्रेस हायवेवर मिराज-2000 चे लँडिंग झाले होते. त्यावेळी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महामार्गाचा लष्करी कारणासाठी वापर केला गेला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ‘मिराज-2000’ उतरवण्यात आले. त्यानंतर रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनेही एक्स्प्रेस वेवर लँडिंग केले. यमुना एक्स्प्रेस वे पहाटे तीन वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला होता. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी रस्त्याला धावपट्टीही बनवावी लागू शकते. विमान कोणत्या रस्त्यावर उतरू शकते, हे ठरवण्यासाठी केलेल्या चाचणीला ‘रोड रनवे टेस्ट’ म्हणतात. हवाई दल देशाच्या विविध भागात असे महामार्ग शोधत असते.
आता लष्करी विमानासाठी पूर्वद्रुतगती रस्त्याचा वापर होणार असल्याने आणि या महामार्गाचे चीनपासूनचे अंतर लक्षात घेता भारताने टाकलेले व्यूहात्मक पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे. बचाव आणि आक्रमण अशा दोन्ही पातळ्यांवर हा द्रुतगती मार्ग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.