Saturday, November 2, 2024
Homeब्लॉगवारीची जीवनद़ृष्टी

वारीची जीवनद़ृष्टी

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये भक्तांचा महामेळा जमतो. विठ्ठलाला माऊली मानून त्याच्या भेटीची ओढ या काळात प्रत्येक वारकर्‍याला लागलेली असते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून सुरु झालेला हा विठ्ठलभक्तीचा मळा यंदा पुन्हा बहरणार आहे. महाराष्ट्र हा मुख्यत्वे ग्रामीण प्रदेश असून त्याला जोडणारा मुख्य घटक हा वारकरी संप्रदाय आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हा मुख्यत्वे वारकरी आहे हे विसरून चालणार नाही. वारकरी संस्था ही प्रामुख्याने शेतकर्‍यांशी संबंधित असल्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाची मानसिकता आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी या संप्रदायाने घडवली. आज हा समाज आधुनिक शहरी जीवनाला सामोरा जात असला तरी त्याची जीवनदृष्टीमागची वारकरी तत्त्वं मात्र तीच आहेत.

आषाढ आणि कार्तिक महिना जवळ आला की सार्‍यांनाच वेध लागतात विठ्ठलदर्शनाचे. तशी तर प्रत्येक भक्ताच्या मनात विठ्ठल दर्शनाची ओढ कायमच असते. विठूरायाला ‘विठूमाऊली’ म्हणून प्रत्येक वारकर्‍याने या देवतेशी आगळंच नातं जोडलं आहे. भक्त पुंडलिकाच्या हाकेला धावून जाणारी ही देवता आपल्याही हाकेला ओ देईल याची खात्री प्रत्येक भक्ताच्या मनात असते. त्यामुळे आषाढ आणि कार्तिक या महिन्यांमध्ये वारीचा सोहळा रंगतो. या वारीमध्ये नानाविध जातीचे वारकरी सामील झालेले असतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून ही वारीची परंपरा सुरु आहे. इतकी वर्षे उलटून गेली पण वारकर्‍यांच्या मनातील विठ्ठलभक्ती जराही कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस अधिकच वाढते आहे. दरवर्षी पंढरीच्या वारीमध्ये जमणारे लाखो वारकरी पाहिले की याची प्रचिती येते. गेल्या सातशे वर्षांपासून ही वारीची परंपरा सुरु आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेले वारकरी सहभागी होतात. वारी हा महाराष्ट्रातल्या धर्मजीवनातला सर्वात मोठा असा मुख्य प्रवाह आहे.

हा वारकरी धर्मसंप्रदाय प्रामुख्याने ग्रामीण शेतकरी आणि बहुजन समाजानेच व्यापलेला होता. यामागच्या वर्गीय आणि जातीय स्वरूपाच्या विश्लेषणाचं काम यापूर्वी गं. बा. सरदार, बा. र. सुंठणकर आणि डॉ. डी.डी. कोसंबी या अभ्यासकांनी केलं आहे. या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा संप्रदाय केवळ धर्मावर आधारित नसून तो सामाजिक वास्तवात पूर्णपणे रुजलेला होता. हा संप्रदाय राजकीय स्वरूपाचाही होता. त्याची चिकित्सा करण्यात गैर काहीच नाही. कारण समाजजीवनाची ही अंग एकमेकांशी निगडीत असतात. म्हणूनच हा मुख्यत्वे कृषीकर्म करणार्‍या शेतकर्‍यांचा संप्रदाय होता आणि आहे.

- Advertisement -

कृषी हा भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्थेचा कणा होता. त्यामुळे बाकीचे बलुतेदारी व्यवसाय किंवा गाववाडा हे शेतीभोवतीच फिरत होते. सामाजातले बलुतेदार हे शेतीशी संबंधित उद्योग करत. शेतीची अवजारं तयार करणारे सुतार, नाडा किंवा कासरा तयार करणारे मातंग यांचे उद्योग शेतीभोवती केंद्रित होते. ही शेती अशा प्रकारे इतर व्यवसायांचा आधार बनली होती.

हीच शेती पावसावर अवलंबून होती. हा पाऊसही अनिश्चित असल्याने तिचं स्वरूपही काहीसं अनिश्चित राहिलं. पाऊस चार वर्ष पडला तर पुढची दोन वर्षे पडेल याची खात्री नव्हती. या सर्वातून माणसाच्या जीवनात आलेली अनिश्चितता आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लागणारी जी तात्त्विक भूमिका लागते, ती तयार करण्याचं काम याच संप्रदायाने केलं. विशेष म्हणजे शेतकर्‍यांबरोबरच गाववाड्यातल्या बलुतेदारांचाही या संप्रदायाची भूमिका ठरवण्यात मोठा वाटा होता.

पावसाची अनिश्चितता आणि त्यामागची तात्विक भूमिका म्हणजे दैववाद नव्हता. शहरी मध्यमवर्गीय बुद्धीवादी वर्गाला हेच समजलं नाही. कारण शहरी जीवनात अडकलेल्या या वर्गाला त्याचा पूर्ण अंदाज नव्हता. वेळ नसणारे लोक पंढरीच्या वारीला जातात, असाच समज त्यांच्यात रूढ झाला होता. वास्तविक ‘मढे झाकुनिया करती पेरणी’ हा तुकोबांचा अभंग वाचला तरी या वारकर्‍यांना वेळेचं किती महत्त्व होतं हे आपोआपच कळेल. वेळेचा अपव्यय समजणार्‍या शहरी वर्गातले हेच लोक मात्र साहित्य संमेलनं आणि सवाई गंधर्व महोत्सवांना दरवर्षी न चुकता जातात.

जगण्यातल्या अनिश्चितेबाबतची वारकर्‍यांची भूमिका हा दैववाद नसून त्यांच्या व्यक्तित्त्वात भिनलेली एक तात्विक जीवनसृष्टी आहे. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ या तुकोबांच्या अंभगाचा अर्थच ही भूमिका अधिक स्पष्ट करतो. एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला तर व्यवसाय सोडायचा नाही, आशा सोडायची नाही हाच विचार त्यातून दिला जातो. आज आधुनिक काळात औद्योगिकीकरणाचा आणि शहरीकरणाचा बलुतेदारीवरही परिणाम झाला आहे आणि गाववाडा पद्धतही बदलून गेली आहे. असं असलं तरीही हा पारंपरिक संप्रदाय लोकांच्या मनात टिकून राहिला तो कुळाचाराच्या स्वरूपात, जो आजही स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ गावातला सुतार आज दुसरीकडे सुतारकी करत असला तरीही तो वारी न चुकता करतो. वारीची रचना ही शेती आणि शेतकर्‍यांची सोय डोळ्यापुढे ठेऊन करण्यात आली आहे. आषाढ शुद्ध एकादशी किंवा कार्तिक शुद्ध एकादशीच्या वार्‍यांपैकी किमान आषाढीची वारी आचारधर्म म्हणून बहुतेक जण पाळताना दिसतात. मुळात वारीचा हंगामच असा पकडला आहे की, पहिला पाऊस पडून गेला आहे आणि पेरण्यांची कामं पूर्ण झाली आहेत. तुलनेने शेतकरी तेव्हा मोकळा असून शेतीचं काम त्याला नसतं आणि याच काळात हे लोक पंढरपुरात पोहोचतात. यातून सामूहिक, सहजीवन आणि सहकार्य या लौकिक जीवनातल्या गोष्टी शेतकरी परमार्थातही आणू शकत. म्हणूनच पंढरपूरला एकट्याने न जाता समूहाने जायचं असा दंडक पडला.

प्रत्येक गावाच्या स्वतंत्र दिंड्या निघत असत. संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या काळात पालखी नव्हती. तेव्हा हे लोक स्वयंस्फूर्तीने दिंडीत टाळ मृदुंग वाजवत, गात-नाचत पंढरपूरला जात. पालखीची पद्धत ही सतराव्या शतकाच्या शेवटी सुरू झाली. तुकोबांचे धाकटे चिरंजीव नारायणबाबा यांनी ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या पादुका एकाच पालखीत नेऊन पालखीची प्रथा सुरू केली. त्यानंतर शंभर वर्षांनी ज्ञानेश्वरांची पालखी वेगळी निघू लागली. सर्व संतांच्या शिकवणीमध्ये शेतीचे उल्लेख आणि वर्णनं केलेली आढळतील. महाराष्ट्राला तेराव्या शतकातला शेतकरी शेती कशी करायचा हे जाणून घ्यायचं उत्तम साधन म्हणजे ज्ञानेश्वरीतील तेरावा अध्याय.

यात शेतीसाठी जमीन तयार करण्यापासून ते शेवटी पीकं काढून बलुतेदारांना वारीपर्यंतची साद्यंत वर्णनं वाचायला मिळतील. याशिवाय एकनाथांच्या भारूडांमध्ये गावगाड्याची माहिती आढळते. गावातले पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, जोशी आणि महार असे शेतीच्या प्रक्रियेशी संबंधित सर्वच त्यामधून भेटतील. याच गोष्टींचा इरावती कर्वे यांनी समाजशास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला आहे. महाराष्ट्र हा मुख्यत्वे ग्रामीण प्रदेश असून त्याला जोडणारा मुख्य घटक हा वारकरी संप्रदाय आहे. तसंच महाराष्ट्रातला शेतकरी हा मुख्यत्वे वारकरी आहे हे विसरून चालणार नाही. असं असलं तरी तो मराठी लेखकाच्या कथा कादंबर्‍यांचा नायक मात्र झालेला दिसत नाही. याला अर्थातच सन्मान्य अपवाद आहे तो लेखक र.वा. दिघे यांच्या कादंबर्‍यांचा. त्यात ग्रामीण प्रदेशातला वारकरी शेतकरी हाच नायक आहे.

हा नायक शेतकरी, वारकरी संप्रदायाची मूल्यं जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी त्यानुसार झगडा देतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची त्यामध्ये उत्तम वर्णनं वाचायला मिळतात. विशेषत: त्यांच्या ‘पाणकळा’ आणि ‘पड रे पाण्या’ या दोन कदंबर्‍यांतून भीमा नदीच्या खोर्‍यातल्या शेतकर्‍यांचं जीवन समर्थपणे उभं केलेलं दिसतं. ‘पाणकळा’चा नायक भुजबा जाधव देशमुख हा मराठा आहे तर ‘पड रे पाण्या’चा संतू मगर हा माळी आहे. महाराष्ट्रात शेती करणार्‍या दोन मुख्य जातींचे ते दोघे प्रतिनिधिक नमुने आहेत.

या कादंबर्‍या लिहिताना दिघे यांनी नागर जीवनातला विरोधाभास आणि पोकळपणा दाखवला आहे. वारकरी संप्रदायातली अमूर्त जीवनसत्वं केवळ न सांगता शेतकरी वारीशीवाय एरव्ही कशा पद्धतीचं संघर्षमय जीवन जगतो हेही त्यांनी त्यातून सांगितलं आहे. अशी वैशिष्ट्यं प्रत्ययास आली की दिघे हे सर्वात मोठे कादंबरीकार आहेत, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पण लोकांनी त्यांच्याकडे या दृष्टीने कधी पाहिलंच नाही.

या दोन्ही कादंबर्‍यामधल्या नायकांपुढे संत तुकाराम हेच आदर्श आहेत. तुकोबा हे स्वत: शेतकरी होते. शेतीच्या सर्व प्रक्रियांची वर्णन त्यांच्या अभंगातून वाचायला मिळतात. शरीर हे ईश्वराने जिवाला कसायला दिलेलं शेत आहे, हा ज्ञानेश्वरीतल्या तेराव्या अध्यायातला धागा हे त्याचं रूपक आहे. त्यावर तुकोबा म्हणतात, ‘पिकल्या शेताचा आम्हा देतो वाटा, चौधरी गोमटा पांडूरंग.’

तुकोबांमधलं हे शेतकरीपण महात्मा फुले यांच्या प्रथम लक्षात आलं. वारकरी संस्था ही प्रामुख्याने शेतकर्‍यांशी संबंधित असल्यामुळे महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाची मानसिकता आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी या संप्रदायाने घडवली. आज हा समाज आधुनिक शहरी जीवनाला सामोरा जात असला तरी त्याची जीवनदृष्टीमगची वारकरी तत्त्वं मात्र तीच आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या