मनोहर कांडेकर
चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी
चाळीसगाव येथे गेल्या काही दिवसांपासून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. वाहनधारकांना पेट्रोलमध्ये चक्क पाणी मिसळल्याचे आढळून येत आहे. वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क पेट्रोल मिश्रीत पाणी टाकण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील पेट्रोलमध्ये भेसळ करणार्या पेट्रोल पंपाचा शोध घेवून तातडीने पंपचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांडून होत आहे.
चाळीसगाव येथील काही पेट्रोल पंपांवर वितरीत केल्या जाणार्या पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. इंधन वितरण करणार्या विविध पेट्रोलियम कंपन्यांतून इथेनॉल मिश्रणाचे सुरू असलेले गौडबंगाल आणि चाळीसगाव येथील काही पेट्रोल पंपचालकांच्या इंधन साठवणुकीच्या टाकीत पाणी असल्याची देखील चर्चा ग्राहकांमध्ये आहे. चाळीसगाव शहरातील काही पेट्रोल पंपचालकांकडून पेट्रोलियम कंपन्यांच्या नावाखाली ग्राहकांची लूटमार सुरू आहे. शहरातील बर्याच गॅरेजमध्ये अचानक दुचाकी बंद पडलेल्या गाड्या दुरुस्तीसाठी येतात. मेकॅनिक जेव्हा पेट्रोलची पाहणी करतो, तेव्हा त्याला दुचाकीच्या टाकीत पेट्रोलमध्ये पाणी आढळुन येते. तेव्हा ग्राहकाला आपली लुटमार झाल्याचे लक्षात येत आहे. परंतू तोपर्यंत त्यांनी अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलेले असते. त्यामुळे नेमक्या कुठल्याही पेट्रोलपंपावर पाणी मिश्रीत पेट्रोल टागले गेले, हे तो नक्की सांगू शकत नसल्यामुळे तो तक्रारीसाठी पुढे येत नाही.
पुरवठा आधिकारी आणि वैधमापन शास्त्र विभागाचे दुर्लक्ष-
गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील पेट्रोल पंपांवरील मशिनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून इंधन चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी ठाणे, पुणे, कोल्हापूरमध्ये काही पंपावर छापे टाकण्यात आले. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. परंतू त्यावर अचानका पडदा पडला. आता अलिकडच्या काळात वाहनधारकांना पाणीमिश्रित पेट्रोल मिळत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. शहरातील काही पंपांवर पेट्रोल भरल्यानंतर काही कालावधीत दुचाकी-चारचाकी वाहन बंद पडते. मोटार अथवा मोटारसायकल सुरू करण्याचा प्रयत्न करूनही वाहनधारक हैराण होतात. दुरूस्तीसाठी मेकॅनिकला बोलविण्यानंतर तपासणीत वाहन नादुरूस्त होण्याचे खरे कारण उघड होत आहे. बहुतांश सर्व दुचाकी मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये दररोज दोन ते तीन दुचाकी वाहने अशा प्रकारच्या दुरूस्तीसाठी येत आहेत. पाणी भेसळीमुळे इंधनाचा स्पार्क प्लग, पिस्टन आणि मायलेजवर परिणाम होत आहे. चाळीसगाव शहर व शहरालगत इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियमचे पंप आहेत. अन्य काही खासगी कंपन्याचे पेट्रोल, डिझेल पंपही आहेत. पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. काही पेट्रोल पंपचालकांच्या पंपांवर टाकीत इंधन उतरविण्यापूर्वीच पाणी असते. त्यामुळे पेट्रोल भरताना पाणीमिश्रित पेट्रोल ग्राहकांना मिळत आहे. विक्री अधिकारी, वैधमापनशास्त्र विभागाचे आधिकारी व शहर पुरवठा विभागाच्या आधिकार्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. दरमहिन्याल जड वजनाचे पाकिट याविभागाच्या आधिकार्यांना मिळत असल्याने आधिकारी याकडे गंभीर प्रकाराकडे लक्ष देत नसल्याचे पेट्रोलपंपावरील कर्मचारीमध्ये चर्चा आहे.
दिवसभरातून चार ते पाच अचानक बंद पडलेल्या दुचाकी आमच्याकडे दुरुस्तीसाठी येतात. आम्ही जेव्हा दुचाकीच्या पेट्रोलची पाहणी करतो, तेव्हा त्यात चक्क पाणी मिश्रीत पेट्रोल आढळुन येत. आम्ही पेट्रोल टाकी सापकरुन दुचाकी दुरुस्त करुन देतो. बर्याच पेट्रोलपंपावर पाणी मिश्रीत पेट्रोल टाकण्यात येत असल्याची ग्राहकांमध्ये चर्चा आहे.
विजय पाटील, मॅकनिक
पेट्रोल पंप हे शासनाच्या आधिपत्याखाली आहे. परंतू आता शासनाचे त्यांच्यावर नियंत्रण राहिले नाही. पेट्रोल पंपाची तपासणी ही फक्त नावालाच आहे. लोकप्रतिनिधीनी सुधा याकडे लक्ष देण्याचे गरज आहे. भेसळयुक्त पेट्रोल विक्री करणार्यांवर तातडीने कारवाई करावी, ज्यामुळे ग्राहकांची होणारी लुटमार काही प्रमाणात का होई ना थांबेल.
प्रा.गौतम निकम, जनआंदोलन खान्देश विभाग