Sunday, May 26, 2024
Homeनगरपाणी वादात शेतकर्‍यांचा बळी देवू नका- कोल्हे

पाणी वादात शेतकर्‍यांचा बळी देवू नका- कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गोदावरी खोरे प्रादेशिक पाणी वादात नगर नाशिक शेतकर्‍यांचा बळी देऊ नका. नसता शेतकर्‍यांचा संघर्ष पाण्यानेही विझणार नाही. शासनाने गोदावरी खोर्‍यावर अवलंबून असणार्‍या चाळीस टक्के शेतकर्‍यांना उघडे नागडे पाडून त्यांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अन्यथा सहकार संपुष्टात येऊन साखर कारखानदारीसह त्यावर अवलंबून असणारी सर्व व्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा इशारा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिला.

- Advertisement -

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या मुहुर्तावर मंगळवारी संचालक सतीश आव्हाड, वैशाली आव्हाड या उभयतांच्याहस्ते पार पडला त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सर्व सभासद शेतकर्‍यांना दसर्‍याच्या सदिच्छा देत सहकारी साखर कारखानदारी टिकविण्यासाठी जास्तीत जास्त खोडवे ठेवून ऊस लागवडीवर भर द्यावा, असे आवाहन केले. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी स्वागत केले.

कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक केले. बिपीन कोल्हे म्हणाले, तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील पाणी जायकवाडीत सोडण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. मेंढेगिरी समितीच्या सर्व शिफारशी या चुकीच्या असून समन्यायी पाणी वाटप कायदा बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांवर कायमस्वरूपी घाला घालणारा आहे. खरीप हातचे गेले रब्बीचा भरोसा राहिलेला नाही, पाणी गेले तर शेतकरी पेटून उठतील. हे पाप उगाचच डोक्यावर घेऊ नका. मायबाप सरकारने या प्रश्नांत वेळीच लक्ष घालावे अन्यथा यातून होणारा संघर्ष न परवडणारा आहे.

देशात कापड उद्योगानंतर साखर उद्योग दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र त्यावर सातत्याने संकटे येऊन तो लयाला जाण्याची भीती आहे. देशाच्या आर्थीक जडणघडणीत आय टी उद्योगाचे स्थान मजबूत होताना दिसत आहे. कच्चा माल शेतीतूनच निर्माण होतो तेंव्हा शेतीसाठी पाणी आणि त्यानुरूप सुसंगत ध्येयधोरणांची अंमलबजावणी व्हावी अन्यथा शेतीवर अवलंबून असणारी सर्व यंत्रणा उद्ध्वस्त होईल, अशी भिती बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी दत्तात्रय कोल्हे, डॉ.एकनाथ गोंदकर, कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, रमेश घोडेराव, विलास वाबळे, त्रंबक सरोदे, संजय औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, अरुण येवले, साईनाथ रोहमारे, शिवाजीराव वक्ते, प्रदीप नवले, संजय होन, दीपक गायकवाड, बाबासाहेब डांगे, कामगार नेते मनोहर शिंदे, गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, त्यांचे सर्व संचालक, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, विवेककुमार शुक्ला, विश्वनाथ भिसे, सचिव तुळशीराम कानवडे आदींसह सभासद, शेतकरी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या