Friday, May 2, 2025
Homeनाशिक१ मे महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी रोखले

१ मे महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी रोखले

इगतपुरी | प्रतिनिधी
इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन योजनेचे कामे फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांच्या आर्थिक फायद्यासाठीच आहे का असा सवाल उपस्थित करुन १ मे महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी रोखणार असा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिला होता. त्यानुसार, एल्गार कष्टकरी संघटनेने १ मे रोजी आंदोलन करत पाणी रोखले. वैतरणा धरणावर एल्गार कष्टकरी संघटनेने जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली योजनेची चौकशी करण्यासाठी व वाडयापाड्यावर टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आक्रमक होत आंदोलनात्मक पवित्रा घेत मुंबईला जाणारे पाणी रोखण्यासाठी आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. वैतरणा धरणावर १ मे रोजी एक आक्रमक आंदोलन करण्यात आले.

मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि महिलांनी धरण परिसरात जोरदार आंदोलन छेडले. आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेले हे आंदोलन अचानक तीव्र झाले. संघटनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी थेट वैतरणा धरणाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅनलमध्ये उड्या मारल्या. हा धक्कादायक प्रकार घडताच प्रशासनाने आणि जलसंपदा विभाग व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी तत्काळ कॅनलमधून मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. संघटनेचा आरोप आहे की, आदिवासी पाड्यांना अजूनही शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळत नाही. वारंवार निवेदने देऊनही स्थानिक जलसमस्या तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अपारदर्शकता आणि दिरंगाई असल्याची तक्रार संघटनेने केली. यावेळी उपस्थित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सुरु असलेल्या सर्व योजनांची चौकशी केली जाईल असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेली, एक चांगली योजना जलजीवन योजना सध्या राज्यात सर्वच ठिकाणी या योजनेतून कामे सुरू आहे. मात्र ते कामे कासव गतीने सुरू आहेत. जे कामे शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाला सन- २०२४ पर्यंत “हर घर नल से जल” प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येईल असे अपेक्षित होते. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, नाशिक, पेठ, सुरगाणा व इतर तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण आहेत. अशा सर्व कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी एल्गार संघटनेने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. तसेच १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंत्रालयावर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी कार्यकर्त्यांना इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबवून लेखी आश्वासन देऊन त्यानुसार १५ एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक झाली. मात्र त्यावेळी झालेल्या निर्णयाची आणि संघटनेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही आणि दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून १ मे रोजी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी बंद करून आंदोलन करण्यात आले अशी माहिती यावेळी एल्गार संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली.

या आंदोलनात संतू ठोंबरे, तानाजी कुंदे, वसंत इरते, सुरेखा मधे, मंगल खडके, मथुरा भगत, मीना लोणे, काळू निरगुडे, तुषार देहाडे, समाधान सदगिर, ढवळू गोहिरे, राजेंद्र आव्हाटे, संदीप झुगरे, गणेश गोहिरे, संतू पादिर, हनुमंत सराई, कविता पुंजारे, संजय पारधी, हनुमंत वारे, शिवाजी दोरे, रामदास सावंत, शांताराम बेंडकोळी, काळू बेंडकोळी, कृष्णा वारे, पदू गांगड, बाळू गांगड, मनोज दिवे, भीमाबाई बांगारे, धोंडाबाई लोते, पिंटू गांगड, नामदेव लचके, नामदेव पारधी, सोमनाथ अव्हाटे, दत्तू बांगारे, सुभाष मधे, गंगुबाई शिद, विलास शिद, लक्ष्मण बांगारे ,भागा आगीवले, यमुना लचके आदी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या