तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाच्या तडाख्याने शेतातील उभ्या डाळिंब बागा सुकू लागल्या आहेत. पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल बनला आहे. टँकरने विकत पाणी आणून बागा जगवण्याचे आव्हान शेतकर्यांना पेलणे अवघड बनले आहे.
दूष्काळपीडित तळेगाव भागातील शेतकर्यांनी दुष्काळाला आव्हान देत मोठ्या प्रमाणात डाळिंब शेती उभी केली. यासाठी खते, औषधे, छाटणी, ठिबक सिंचन यावर शेतकर्यांना मोठा खर्च करावा लागतो. सध्या उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याअभावी डाळिंबाच्या बागा सुकून जावू लागल्या आहेत. तळेगाव भागात विहिरी व कूपनलिकांना पाणी नाही. भूगर्भातील पाणी पातळी खोलवर गेली आहे. अशा परिस्थितीत बागा जगवण्यासाठी शेतकर्यांना टॅँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली.
वर्षानुवर्षे या भागात टंचाईस्थिती कायम आहे. दुष्काळाचे आव्हान पेलत शेतकर्यांनी डाळिंब बागा उभारत जोपासना केली. कर्ज काढून रोपे, मशागत, खत, ठिंबक सिंचन, औषधे यावर मोठा खर्च केला. परिसरात नवीन बागांची लागवड करण्यात आली आहे. मात्र पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे टँकरने पाणी आणून डाळिंब बागा जगवण्याशिवाय शेतकर्यांना पर्याय उरला नाही. साठवलेले पाणी संपल्याने अनेक शेतकर्यांचे शेततळे कोरडेठाक झालेत. यंदाचा उन्हाळा कठीण ठरत असून पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा सुरु झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता भासत आहे. त्याचा परिणाम डाळिंब बागांवर होत आहे. उन्हाळ्यात बागा वाचवण्याचे आव्हान आम्हा शेतकर्यांसमोर ठाकले आहे.
- अमोल दिघे, (तरुण शेतकरी-तळेगाव दिघे)