Friday, May 3, 2024
Homeनगरसाठवण तलाव कोरडा पडल्याने पुणतांबेकरांवर पाणीटंचाईचे सावट

साठवण तलाव कोरडा पडल्याने पुणतांबेकरांवर पाणीटंचाईचे सावट

पुणतांबा (वार्ताहर) /puntamba – गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणार्‍या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या तलावातील पाणी संपल्यामुळे पुणतांबा ग्रामस्थांना गेल्या दोन दिवसापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सध्या तलावातील पाणी संपल्यावर पूरक पाणी पुरवठा योजने अंतर्गत गोदावरी नदीच्या काठावर रास्तापूर शिवारातील विहिरीतून पाण्याचा उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रामार्फत ग्रामस्थांना पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. मात्र विहिरीवरील पाण्याचा उपसा करणारे पंप नादुरुस्त झाल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही. त्यातच जलशुद्धीकरण केंद्रात बंद पडलेल्या पंप हाऊसची दुरुस्ती तसेच जलस्वराज योजने अंतर्गत असलेल्या नवीन साहित्य उपकरणांची जोडणीचे काम सुरु असल्यामुळे त्याचा परिणाम पाणीपुरवठा करणार्‍या व्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामस्थांना नेहमीप्रमाणे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

साठवण तलावाची क्षमता कमी असल्यामुळे तो कोरडा होणे नवीन नाही. मात्र त्याचे पाणी संपण्याच्या अगोदर ग्रामपंचायत प्रशासनाने किमान पाच दिवस अगोदर पाणीपुरवठा करण्यासाठीचा पर्यायी मार्गाची चाचणी करून तो अद्ययावत करून ठेवणे गरजेचे आहे. विद्यमान सत्ताधार्‍यांना ग्रामपंचायतीची सुत्रे स्वीकारून तीन वर्ष झाली आहेत. असे असताना अद्यापही गावाला पाणीपुरवठा करण्याचे अचूक नियोजन करता येत नाही का? याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र प्रतिक्रिया निर्माण होऊ लागल्या आहेत. नेहमीच तांत्रिक कारणे सांगणे आता उचित वाटत नाही, असे बहुतांशी ग्रामस्थांचे मत आहे. पाणी टंचाईच्या प्रश्‍नावर विरोधी गट सुद्धा बघ्याची भूमिका घेत असल्याबद्दल ग्रामस्थांचा सुद्धा नाईलाज दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या