अकोले |प्रतिनिधी| Akole
यावर्षीच्या उन्हाळ्याअखेर म्हणजेच 31 मे 2024 राज्यातील मराठवाड्यासह सर्वच महसूल विभागांतील महत्त्वाच्या धरणांमधील पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे. मराठवाड्यातील व उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक धरणे कोरडी पडलेली आहेत. बहुतेक धरणांचा पाणीसाठा हा मृत पाणीसाठ्याच्या खाली गेलेला असून सर्वत्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गतवर्षी 31 मे 2023 रोजी राज्यातील सर्वच विभागांतील महत्त्वाच्या प्रमुख धरणांमध्ये पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यावर्षी मराठवाड्यातील प्रमुख 9 ते 10 प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा हा अत्यंत कमी म्हणजे सुमारे 23 टीएमसी इतकाच शिल्लक राहिलेला आहे.
मराठवाड्यासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणातील 31 मे 2024 रोजीचा एकूण पाणीसाठा सुमारे 29.69 टीएमसी व उपयुक्त पाणीसाठा फक्त 3.625 टीएमसी म्हणजेच (4.73%) इतका शिल्लक राहिला असून तो गतवर्षीपेक्षा सुमारे 25 टक्क्यांनी कमी आहे. जायकवाडी धरणातील बाष्पीभवन व्यय यावर्षात सुमारे 8.42 टीएमसी (8.20%) इतका नोंदवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण प्रमुख पंचवीस धरणांमध्ये 1 जून, 2024 चा उपयुक्त पाणीसाठा हा गतवर्षीपेक्षा 13.097 टीएमसी (सुमारे 16%) कमी म्हणजेच फक्त 5.048 टीएमसी इतकाच शिल्लक राहिलेला आहे. संगमनेर तालुक्यातील निमोर्णें तळेगाव या विभागासाठी काहीअंशी वरदान ठरलेले भोजापूर धरण देखील मे महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यानंतर मृतसाठ्याच्या खाली गेलेले आहे.
1 जून 2024 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात एकूण 1047 दलघफूट (9.48टक्के), निळवंडे धरणात 659 दलघफूट म्हणजेच (7.92 टक्के) तसेच मुळा धरणात 6378 दलघफूट (24.53टक्के), आढळा धरणात 372 दलघफूट (35.09टक्के) इतकाच पाणीसाठा सद्यस्थितीत शिल्लक आहे. भंडारदरा व निळवंडे धरणातून आता फक्त पिण्यासाठीच 2 आवर्तने सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील उर्वरित धरणांमध्ये जवळपास सरासरी 10 टक्के पाणीसाठा शिल्लक असून बहुतेक पाझर तलाव, लपातलाव, मध्यम प्रकल्प कोरडे पडलेले आहेत. भीमा खोर्यातील पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 24 प्रमुख धरणांमध्ये सुमारे 20.65 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
याच विभागातील राज्यात सर्वात मोठे असलेले उजनी धरणामध्ये (साठवण क्षमता : 117.2427 टीएमसी) 1 जून 2024 रोजी एकूण पाणीसाठा 31.69 टीएमसी म्हणजे 27.02 टक्के व उपयुक्त पाणीसाठा उणे (-) 31.97 टीएमसी म्हणजेच उणे (-) 59.67 टक्के इतका शिल्लक राहिलेला असून तो गतवर्षीपेक्षा सुमारे 36 टक्के इतका कमी आहे. याचबरोबर पुणे विभागातील कृष्णा खोर्यामधील प्रमुख तेरा धरणांमध्ये आजमितीस 30 सुमारे 30.44 टीएमसी म्हणजेच 17.19 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळते आहे. खडकवासला धरण समूहामध्ये आजमितीस सुमारे 5.19 टीएमसी (17.79 टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून तो गतवर्षीपेक्षा सुमारे 6 टक्क्यांनी कमी आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धरणांपैकी एक असलेल्या कोयना धरणामध्ये 31 मे, 2024 रोजी सुमारे 18.37 टीएमसी (17.45%) इतका पाणीसाठा व 13.25 टीएमसी (13.23%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून तो जवळपास गतवर्षी इतकाच 13.44 टक्के आहे.
पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील धरणांमध्ये पिण्यासाठी पुरेसा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून मुंबई, ठाणे व इतर शहरांना पाणीपुरवठा करणार्या कोकणातील प्रमुख 4 धरणांमध्ये देखील पाणीसाठा 14.43 टीएमसी पूर्वीपेक्षा निश्चितच कमी झालेला आहे (29.57 टक्के). तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणार्या पाच धरणांमध्ये सुमारे 3.78 टीएमसी इतका पाणीसाठा असून ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणार्या बारावे धरणात सुमारे 3.43 टीएमसी म्हणजेच 28.69 टक्के इतका पाणीसाठा आहे. तसेच अमरावती विभागातील प्रमुख 7 धरणांमध्ये सुमारे 14.73 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 14.15 टक्के इतकी आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असून यापुढे पावसाळा वेळेवर सुरू न झाल्यास निश्चितपणे तीव्र पाणीटंचाईला राज्यातील जनतेला सामोरे जावे लागणार आहे. यावरुन पाण्यासाठी होणारा संघर्ष टाळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने तातडीने पावले उचलून येत्या पाच-सहा वर्षांमध्ये योजनाबद्ध कार्यक्रम निश्चित करून त्याची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर अंमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाने पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे मत सेवानिवृत्त अभियंता व जलसंपत्ती अभ्यासक हरिश्चंद्र चकोर यांनी व्यक्त केले आहे.