मुंबई | प्रतिनिधी
आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे.जे प्रकल्प सुरू आहे ते प्रकल्प बंद करणार नाही पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेतले जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत आम्ही सगळी माहिती घेत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचे नाही अशी आमची वृत्ती नाही.
योग्य वेळी योग्य निर्णय घेवू असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याबाबत माहिती घेवू असे सांगतानाच ४० हजार कोटी रुपयांबाबत खासदारांनी वक्तव्य केल्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
भिमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना आमचे सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. कोणते गुन्हे गंभीर आहे. कोणत्या गुन्हयामध्ये जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
अजून खातेवाटपाबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे मी कुणाला पाठिशी घालतोय असा प्रश्नच उद्भवत नाही. गुन्हे आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल. गैरसमज पसरवू नये. सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचे आहेत असेही जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना सांगितले.
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे त्यामुळे मदत देण्यासाठी समान धोरण राबवू. आम्ही पक्ष बघून निर्णय घेणार नाही. ज्याला आवश्यक असेल त्याला आढावा करून मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना मदत करणे आमचे प्राधान्य राहिल असेही जयंत पाटील म्हणाले.