Sunday, October 6, 2024
Homeदेश विदेशएलॉन मस्क यांचा खळबळजनक दावा, EVM हॅक होऊ शकतं; भारतात सत्ताधारी विरोधकांमध्ये...

एलॉन मस्क यांचा खळबळजनक दावा, EVM हॅक होऊ शकतं; भारतात सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
टेस्लाचे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म साईट X चे मालक एलॉन मस्क यांनी ईव्हीएमला हद्दपार करण्याची मागणी केल्यानंतर सर्वाधिक पडसाद भारतात उमटले आहेत. मस्क यांच्या या कृतीनंतर भारतात नवीन वादाला तोंड फुटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एलॉन मस्क यांच्या निवडणुकांमधून ईव्हीएम काढून टाकण्याबाबतच्या मतावर टीका केली. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी भारतात येऊन काहीतरी शिकायला हवे, असा टोलाही चंद्रशेखर यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही या वादात उडी घेतली आहे. तर राहुल गांधी यांनी ही महाराष्ट्रात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या रविंद्र वायकर यांच्या निकालाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

एलॉन मस्क यांच्या पोस्टमुळे वाद
अमेरिकेत होणाऱ्या २०२४ राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या रॉबर्ट एफ. केनडी ज्युनिअर यांनी पोर्टो रीको येथे झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले, असे ‘असोसिएट प्रेस’ या वृत्तसंस्थेचा संदर्भ देत आपल्या एक्स (ट्वीटर) पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र नशिबाने या निवडणुकीमध्ये पेपरवर मते नोंदवण्यात आल्याने गोंधळ लक्षात आला निसटलेली मते मोजली गेली, असेही केनडी यांनी सांगितले. मात्र पेपर नसते तर काय झाले असते? असा प्रश्न केनडी यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

एलॉन मस्क यांची पोस्ट
“आपण इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स टाळल्या पाहिजेत. त्या माणसांकडून किंवा एआयकडून हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा हॅकिंगचा धोका फार अधिक आहे,” असे मस्क यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे.

राजीव चंद्रशेखर यांनी दिले चोख प्रत्युत्तर
चंद्रशेखर म्हणाले की, एलॉन मस्कचे विचार यूएस आणि इतर ठिकाणी लागू होऊ शकतील, जिथे ते इंटरनेट-कनेक्टेड मतदान यंत्रे तयार करण्यासाठी नियमित संगणकीय प्लॅटफॉर्म वापरतात. मात्र, भारतात हे शक्य नाही. भारतीय ईव्हीएम कस्टम-डिझाइन केलेले, सुरक्षित आणि कोणत्याही नेटवर्क किंवा मीडियापासून वेगळे असल्याचा दावा चंद्रशेखर यांनी केला.

भारतीय ईव्हीएममध्ये कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही, ब्लूटूथ, वाय-फाय किंवा इंटरनेट असा कोणताही मार्ग नाही. फॅक्टरी-प्रोग्राम केलेले नियंत्रक जे पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकत नाहीत, अशी माहिती चंद्रशेखर यांनी दिली. भारताप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तुम्हालाही तयार करता येऊ शकतात. आणि हे तंत्रज्ञान शिकवण्याव आम्हाला आनंद होईल.”

क्वॉन्टम कंप्यूटसह, मी कोणत्याही स्तरावरील एन्क्रिप्शन डिक्रिप्ट करू शकतो, लॅब लेव्हल टेक आणि भरपूर संसाधनांसह, मी जेटच्या काचेच्या कॉकपिटच्या फ्लाइट कंट्रोल्ससह कोणतेही डिजिटल हार्डवेअर/सिस्टम हॅक करू शकतो. पण ईव्हीएम सुरक्षित आणि कागदी मतदानाच्या तुलनेत विश्वासार्हतेचा एक वेगळा प्रकार आहे. आणि आम्ही असहमत असण्यास सहमती देऊ शकतो, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया
‘तंत्रज्ञान’ हे समस्या सोडवण्यासाठी आहे, जर ते समस्यांचे कारण बनत असेल तर त्याचा वापर बंद केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिली आहे. आज जेव्हा जगभरातील अनेक निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील नामवंत तंत्रज्ञान तज्ज्ञ ईव्हीएममधील फेरफाराच्या धोक्याबद्दल उघडपणे लिहित आहेत, तेव्हा भाजपने ईव्हीएम वापरण्याचा आग्रह धरण्याचे कारण काय? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्याची आमची मागणी आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या