Sunday, November 24, 2024
Homeनगरवरातीसाठी आलेल्या 52 जणांना अन्नातून विषबाधा

वरातीसाठी आलेल्या 52 जणांना अन्नातून विषबाधा

नवरदेवासह नातेवाईक, मित्रांवर रुग्णालयात उपचार

लोणी |वार्ताहर| Loni

राहाता (Rahata) तालुक्यातील राजुरी (Rajuri) गावातील दोन कुटुंबात थाटात विवाह (Marriage) सोहळा संपन्न झाला. मात्र त्याच रात्री वरातीसाठी आलेले नातेवाईक, मित्र आणि कुटुंबियांना घरीच बनवलेल्या जेवणातून विषबाधा (Poisoning) झाल्याने 52 जणांना प्रवरा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. यात नवरदेवाचाही समावेश असून सर्वांची प्रकृती उपचारानंतर स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

राजुरी येथील पठारे आणि लाळगे या गावातील दोन प्रतिष्ठित कुटुंबांतील वधु-वरांचा शुक्रवारी विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. दोन्ही कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक आनंदात असताना दुःखद घटना घडली. पठारे कुटुंबात नववधूचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नवरदेवाचे मित्र, नातेवाईक आणि गावातील अनेक स्नेही वरातीसाठी पठारे यांच्या घरी पोहचले. लग्नाच्या धावपळीने थकुनही घरच्या महिलांनी स्वयंपाक घरीच बनवला. सर्वांनी जेवणाचा आनंद घेतल्यावर वरात सुरू झाली. बराचवेळ वरातीचाही आनंद घेण्यात आला. मात्र त्यातील काहींना मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. हळूहळू जेवण केलेल्या अनेकांना हा त्रास जाणवू लागल्याने परिसस्थितीचे गंभीर लक्षात घेऊन त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आणण्यास सुरुवात झाली.

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी (Doctor) परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने वरिष्ठ डॉक्टरांना माहिती देत उपचार सुरू केले. पहाटे पाच वाजेपर्यंत 52 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. महाजन, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. पवार, डीन डॉ. राजविर भलवार, असिस्टंट वैद्यकीय संचालक डॉ. जगदाळे, आपत्कालीन विभाग प्रमुख डॉ. अनिल माने, युनिट इनचार्ज डॉ. दादासाहेब कुलकर्णी, नर्सिंग इनचार्ज संगीता विखे, प्रशासकीय अधिकारी श्री. घुले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हृषिकेश चव्हाण व त्यांच्या वैद्यकीय आणि बालक विभागाच्या टीमने तातडीने औषधे व इतर सुविधा उपलब्ध करून देत उपचार सुरू केले.

दुपारपर्यंत अ‍ॅडमिट असलेल्या 20 महिला, 1 बालक आणि 31 पुरुष यांच्यावर उपचार केले. दुपारपर्यंत 21 जणांना घरी सोडण्यात आले. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. जगदाळे यांनी दिली. एकही रुग्णाला आयसीयुमध्ये ठेवण्याची गरज पडली नाही. अन्नातून झालेली ही विषबाधा असून त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कोणत्या प्रकारची विषबाधा होती हे स्पष्ट होईल, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या