Friday, May 3, 2024
Homeनाशिकशेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजार

शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका निवडणूक 2022 ही काही महिन्यावर येऊन ठेपली असुन या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांनी पक्ष संघटनासह विभाग, प्रभाग व वार्डात मोर्चे बाधणी सुरु करीत नवीन पदाधिकार्‍यांना संधी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडुन मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी व गृहीणी बचतीसाठी शेतकर्‍यांचा शेतमाल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्याचा नवीन फंडा अवलंबण्यात आला आहे. या प्रयोगाला नागरिकांकडुन प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेवर पुढच्या निवडणुकीत भगवा फडकविला जाणार असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक दौर्‍यावर बोलून दाखविले आहे. पुढचा महापौर देखील सेनेचाच होणार असेही खा. राऊत यांनी सांगितल्यानंतर आता सेनेच्या पदाधिकारी – शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर सेनेकडुन आता शहरातील पक्ष संघटनासह मतदार नोंदणी व मतदारांशी संपर्क या माध्यमातून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

या एकुणच पार्श्वभूमीवर गृहीणींना दिलासा देऊन त्यांच्या कुटुंबाना जवळ करण्याचा नवीन फंडा शिवसेनेकडुन हाती घेण्यात आला. याकरिता कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या योजनेच्या अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक असा आठवडे बाजार शहरातील विविध भागात भरविण्याचे नियोजन महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले आहे. प्रत्येक गृहीणीच्या खर्चात 20 ते 25 टक्के बचत करण्यासाठी सेनेकडुन आठवडे बाजाराचा फंडा हाती घेण्यात आला आहे.

यात शेतकर्‍यांचा ताजा शेतमाल ग्राहकापर्यंत शेतकरी बचत गटामार्फत घेऊन तो ग्राहकापर्यंत पोहचविण्याचा दुवा सेना बनणार आहे. या बाजाराच्या माध्यमातून शेतकरी व गृहीणी कुटुंब अशा मतदारापर्यंत पोहचण्याचे काम आता सेनेकडुन हाती घेण्यात आले आहे. यातील पहिला प्रयोग शहरातील नवीन पंडीत कॉलनीत झाला असुन त्यास गृहीणी व नागरिकांकडुन चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे सेनेकडुन आता सहा विभागात टप्प्या यप्प्याने आठवडे बाजार भरविण्यात येऊन मतदारापर्यंत पोहचण्याचे काम पुढच्या काळात केले जाणार आहे. या सेनेच्या नवीन फंड्याने इतर राजकिय पक्षांचे लक्ष वेधले आहे.

शेतकरी व गृहिणीचे हित

या योजनेत शेतकरी गटामार्फत खरेदी केलेल्या भाजीपाल्यातून व शेतमालातून प्राप्त झालेला पैसा हा कोणत्याही मध्यस्थाला न जाता तो थेट उत्पादक शेतकर्‍याला मिळणार आहे. त्यातून शेतकर्‍यांना त्यांच्या कुटूंबांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, वस्त्र, निवारा आणि शेतीचा विकास यावर खर्च करण्यासाठी उपयोग होणार आहे. आपला शेतकरी बळकट झाला तरच देशही बळकट होईल तसेच या उपक्रमामुळे प्रत्येक गृहीणीला 20 ते 25 टक्के स्वस्त दरात शेतमाल मिळाल्यामुळे त्यांच्या खर्चातही बचत होणार असल्याचे बालगणेश फाऊंडेशनचे अध्यक्ष व मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या