नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील खरवंडी येथील एका वीटभट्टी चालकाने चक्क नदीपात्रात अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे विहीर खोदल्याची बाब जागरुक ग्रामस्थांनी उघडकीस आणली असून संबंधितांने या खोदकामातून मोठ्या प्रमाणावर निघालेल्या वाळू, मुरूम, डबर या गौणखनिजाचीही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप केला आहे. खरवंडी ग्रामस्थांनी काँग्रेसच्या परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप मोटे यांची भेट घेऊन याप्रकरणी पाठपुरावा करण्याची मागणी केली. त्यानुसार मोटे यांनी जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकार्यांना लेखी निवेदन देऊन या बेकायदेशीर विहीर खोदकामावर कारवाई करण्याची मागणी केली.
महसूल विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष घातल्यावर सूत्रे फिरून स्थानिक महसूल यंत्रणेने पूर्णत्वास आलेल्या या विहिरीचे खोदकाम बंद पाडले. मात्र सदरचे खोदकाम करणार्या पोकलेनवर नियमानुसार कारवाई न करता त्याला पळून जाण्याची संधी दिल्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाल्याचा दावा मोटे यांनी केला आहे. विहीर खोदकाम करणेकामी ग्रामपंचायत तसेच भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी घेतली नाही तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीची पाणीपुरवठा करणारी बंद विहीर व सध्या खोदकाम चालू असलेल्या विहिरीचे अंतर हे 500 मीटरच्या आत असल्याचे दिसून येते.
तसेच गटाची हद्द व निशाणी निश्चित केलेबाबत मोजणी नकाशा सादर केला नसल्याने खोदकाम चालू असलेली विहीर ही त्यांच्या हद्दीत आहे की नदीपात्रात आहे याचा बोध होत नाही. सदर खोदकाम चालू असलेले विहिरीचे खोदकाम थांबविण्यात आलेले आहे, असा अहवाल मंडल अधिकारी वडाळाबहिरोबा यांनी तहसीलदारांना सादर केलेला आहे.