पश्चिम बंगाल | West Bengal
पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे MBBS चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या घटनेवर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडले आहे. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले आहेत.
या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर (कॉलेजला) जाऊ देऊ नये. त्यांनी स्वतःचे रक्षणही केले पाहिजे. हा जंगलाचा परिसर आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही. जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल.’ त्यांच्या या विधानामुळे गोंधळ उडाला असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
नेमके काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “ती मुलगी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ही कोणाची जबाबदारी आहे? ती रात्री साडेबारा वाजता बाहेर कशी गेली? जेवढे मला माहिती आहे त्यानुसार ही घटना (बलात्कार) जंगलात घडली. साडेबारा वाजता काय घडले, मला माहिती नाही, त्याचा तपास सुरू आहे. घटना पाहून मला धक्का बसला आहे, पण खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही देखील त्यांच्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी मुलींची…त्यांना रात्रीच्या वेळी बाहेर येण्याची परवानगी नसली पाहिजे. त्यांनी स्वत:चेही संरक्षण करायला हवे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
तसेच त्यांनी पुढे असेही म्हटले की, आम्ही पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. पोलीस सर्व संबंधितांची चौकशी करत आहेत. दोषींना कठोर शिक्षा होईल. मात्र, त्यांच्या “मुलींनी रात्री बाहेर जाऊ नये” या विधानावर अनेक महिला संघटनांनी टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अशा वक्तव्यांनी पीडितांनाच दोषी ठरवण्याची प्रवृत्ती वाढते.
ममता बॅनर्जींची इतर राज्यांवर टीका
ममता बॅनर्जींनी या संदर्भात ओडिशाचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केला की, तीन आठवडेपूर्वी ओडिशातील समुद्रकिनाऱ्यावर तीन मुलींवर बलात्कार झाला होता. तिथे सरकार काय करतेय? आम्ही आमच्या राज्यात आरोपींवर एका-दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल करून न्यायालयाकडून फाशीची शिक्षा मिळवली. मग इतर राज्यांनी असे का नाही केले? मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, अशा अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना घडतात, पण तिथल्या सरकारांची प्रतिक्रिया मंद असते. आम्ही मात्र तत्काळ कारवाई करतो.
नेमके काय घडली घटना?
दुर्गापूरमधील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर शुक्रवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत जेवायला बाहेर गेली होती. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




