दिल्ली l Delhi
जेष्ठ बंगाली अभिनेते, दिग्दर्शक सौमित्र चटर्जी यांचे आज (रविवार) कोलकता येथे एका खासगी रूग्णालयात निधन झालं. शनिवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते ८५ वर्षांचे होते. ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चटर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
बंगाली चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण, आघाडीचे आणि दमदार दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. सन १९८९ मध्ये आलेल्या ‘अपुर संसार’ चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. सौमित्र यांनी ऑस्कर विजेते दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत १४ चित्रपटांमध्ये काम केले होते. सौमित्र चटर्जी यांचा दमदार अभिनय आणि रंगमंचावरील समयसुचकता त्यांना उत्कृष्ट अभिनेता बनवून गेला. सौमित्र हे पहिले भारतीय अभिनेते होते, ज्यांना फ्रास सरकारच्या वतीने देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार Ordre des Arts et des Lettres देऊन सन्मानित करण्यात आले होते. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित सौमित्र चटर्जी यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना संगीत नाटक अॅकेडमी अवॉर्ड, ७ फिल्मफेअर आणि पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.