Sunday, September 8, 2024
Homeभविष्यवेधकाय आहे आषाढी एकादशीचा इतिहास ?

काय आहे आषाढी एकादशीचा इतिहास ?

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाचा अनुभव वारीच्या निमीत्ताने प्रत्येक वारकर्‍याला येत असतो. पंढरीचा राजा हा प्रत्येक वारकर्‍याचा श्वास आहे. त्याचे नाव घेतल्याशिवाय वारकरी कार्य करत नाही. अशा विठ्ठलभक्त असलेल्या वारकर्‍यांचा संगम चंद्रभागेच्या वाळवंटात विठूच्या साक्षीने होत असतो. प्रत्येक वारकरी विठूला आळवत जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतो. विश्वाचे कल्याण चिंतणे, गृहस्थ धर्माचे योग्य पालन करणे, भागवत धर्माचे भक्ती मार्गाने पालन करणे हेच वारकर्‍यांचे भक्तीमय जीवन होय.

भारतीय संस्कृतीत सन्मार्गांने वागावे, सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यात सांगितले आहे. आपल्या मनातील अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असते हे कोणी नाकारु शकत नाही. मानव व पशु यातील महत्त्वाचा फरक निती अनितीचे परिक्षण करणारी बुद्धि हाच म्हणावा लागेल. परोपकाराय पुण्याय हा जागतिक सिद्धांत महर्षी व्यासांनी मांडल्याचे आपण जाणतोच, मात्र त्यानुसार आचरण ही कर्मकठीण गोष्ट आहे. याची कमीअधिक प्रचिती प्रत्येकास येतच असते. आपणास प्रयत्नपुर्वक या सन्मार्गदायक महासुत्राचे आचरण करावयाचे असेल तर मन नावाचे इंद्रिय आज्ञेत असणे अत्यावश्यक म्हणावे लागेल. आपल्या प्रत्येक धर्मानुष्ठानाचे उच्चतम ध्येय मनाची स्वभाविक चंचलता कमी करुन सरावाने मनोनिग्रह करणे हेच आहे.

उपनिषदांचे मत शरीर रथ, इन्द्रिय घोडे व मन लगाम आहे. त्यामुळे मनावर नियंत्रण यशाचा राजमार्गच म्हणावा लागेल. दहा इन्द्रियांनंतर मनास अकरावे इन्द्रिय म्हणून शास्त्राने मान्यता दिली आहे, म्हणून एकादशीस (अकराव्या तिथीस) भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. मनावर अंकुश ठेवायचा असेल तर त्यादृष्टीने एकादशीस व्रत करणे फलदायी ठरते. आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते मूलतः काम्यव्रत असते म्हणजे उत्तम नोकरी, व्यावसायिक प्रगती , सांसारीक सुख हा प्रामुख्याने हेतु असतो. अशाप्रकारची व्रते ऐच्छिक असतात ती कोणी निसर्गतः स्वीकारत नसतो. उदिष्टपूर्तीसाठी दैवीउपासना हे त्यांचे लक्ष असते. मात्र एकादशी व्रत हे श्वासोश्वास करणार्‍या मानवाने जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगिण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे. उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे. आहारशास्त्राचा विचार केला तर लंघन करणे हे शरीरास आरोग्यदायक ठरते, जसे शरीराचे आरोग्य आवश्यक आहे तसेच मनास सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी एकादशीस हरिस्मरण करणे हितकारक ठरते.

श्रीविठ्ठला बद्दल निरपेक्ष प्रेमभाव हे असाधारण बळ प्रदान करणारे ठरते. आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचे दर्शन घेण्यास मंगलमय वारीत सहभागी होतात. त्याचे एकमात्र कारण विठठलाचे प्रेमस्वरुप नाम ॥विठोबाचे नाम सुलभ सोपारे। तारी एकसरें भवसिंधु॥ येणा-या प्रत्येकावर समानभावाने प्रेमकरणारा व भवसिंधू तरुन जाण्यास तळमळीने साह्यभुत होणारा विठठल हाच सकलांचा आधार ठरतो. हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे असे मानणे, व त्यानुसार आचरण करणे मानवास सात्विक बनवते. अशा हरिभक्ताच्या मनातील हरिचिंतनाची सहजस्पंदनाने भूमंडलातील अमंगलाचे अघमर्षण व मांगल्याचे प्रक्षेपण करत असते आणि तेही निरपेक्ष आणि अविरत.

कलीयुगात अशा ज्ञातअज्ञात हरिभक्तांच्या पुण्यप्रभावानेच सन्मार्गाने जाणा-यांना अपयशाच्या महाद्वारात उभे राहूनही हरिनिष्ठ राहण्याचे अभेद्य बळ मिळत असते. यशापयशाच्या आलेखावरुन आपल्या भक्तिचे किंवा इश्वरीकृपेचे मुल्यांकन आपण करु शकत नाही. मनातील असंतुलीत आंदोलने, अनामिक भय, सर्वसाधनसंपत्तीने सालंकृत असूनही निद्रादेवीची अवकृपा व सतत असमाधानाचे बीजारोपण, या लक्षणांच्या यादीत चढत्या भाजणीने होणारी वाढ थांबवणे हे आपले उदिष्ठ असणे अगत्याचे आहे. कारण विठठलाचे स्वरुप तर शांताकारम् आहे. आम्ही अल्पसंतुष्ट मनोवृत्तीचा पुरस्कार करत आहोत असे कदापि समजू नये. नित्यस्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धक अशी आपली ख्याती जरुर असावी, मात्र त्याच बरोबर शाश्वत सर्वोत्तमाचा ध्यासही घ्यावा. आणि त्यासाठी आषाढी एकादशी हा अत्युत्तम मुहूर्त आहे हे वेगळे सांगावयास नको.

देवशयनी एकादशीचा इतिहास – पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.
देवशयनी एकादशीचे महत्त्व – आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे.

पंढरपूरची वारी – हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते. चातुर्मासाची सुरुवात आषाढ शु। एकादशीने होते. एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमधे प्रत्येकामधील सात्त्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळे या दिवशी साधनाकरण अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो. सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी. तिचं महात्म्य असं आहे.

वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो। भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या