Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशUnion Budget 2023 : संसदेतील अभिभाषणात राष्ट्रपती मुर्मू कलम ३७०, तिहेरी तलाकवर...

Union Budget 2023 : संसदेतील अभिभाषणात राष्ट्रपती मुर्मू कलम ३७०, तिहेरी तलाकवर काय म्हणाल्या?

मुंबई | Mumbai

आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन (Union Budget 2023) सुरू होणार आहे. त्यापूर्वी सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी त्यांनी केंद्रातल्या विद्यमान मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केलं.

- Advertisement -

Union Budget 2023 : अर्थसंकल्पाबद्दलच्या ‘या’ इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

‘जो भारत पूर्वी स्वतःच्या समस्यांसाठी इतर देशांवर अवलंबून होता, तोच भारत आता जगभरातील दुसऱ्या देशांच्या समस्या सोडवू लागला आहे. आत्मनिर्भरतेमुळे भारत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाचं सरकार भारताला भ्रष्टाचारमुक्त बनवू पाहात आहे, भारताला त्याचबरोबर एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनवणे हे आपले ध्येय आहे,’ असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषणात म्हणाल्या.

‘देशातील सध्याचे सरकार हे राष्ट्र उभारणीचे कर्तव्य पार पाडण्यात गुंतले असून, हे सरकार स्वप्ने पूर्ण करणारे सरकार असल्याचे मूर्मू म्हणाल्या. तसेच भारतात प्रगतीसोबतच निसर्गाची काळजीदेखील या सरकारकडून घेतली जात आहे. आज देशात स्थिर, निर्भय आणि निर्णायक सरकार अस्तित्त्वात असून, मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी काम करत असल्याचे,’ राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

‘आयुष्मान भारत योजनेने देशातील करोडो गरीब लोकांना गरीब होण्यापासून वाचवले आहे, ८० हजार कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचवले आहेत. सर्जिकल स्ट्राईकपासून दहशतवादावर कठोर कारवाईपर्यंत, नियंत्रण रेषेपासून एलएसीपर्यंत, कलम ३७० रद्द करण्यापासून ते तिहेरी तलाकपर्यंत प्रत्येक गैरप्रकाराला चोख प्रत्युत्तर देण्याची माझ्या सरकारची ओळख आहे,’ असे मुर्मू म्हणाल्या.

‘पूर्वी कर परतावा मिळण्यासाठी खूप वाट पहावी लागत होती. आज आयटीआर दाखल केल्यानंतर काही दिवसात परतावा मिळतो. जीएसटीच्या माध्यमातून पारदर्शकतेसोबतच करदात्यांच्या प्रतिष्ठेचीही खात्री केली जात आहे. ११ कोटी छोटे शेतकरी हे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होते. आता त्यांना सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत,’ असे मुर्मू म्हणाल्या.

अर्थसंकल्पाआधी PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाआधी माध्यमांशी संवाद साधला. आजचा दिवस भारतासाठी एक महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती पहिल्यांदाच संयुक्त सभागृहाला संबोधित करणार आहेत. आजचा दिवस महिलांसाठी सन्मानाचा दिवस आहे. दुर्गम जंगलात राहणाऱ्या आपल्या देशातील महान आदिवासींचा हा सन्मान आहे.

आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आपले पहिले भाषण संयुक्त सभागृहासमोर करत आहेत, हा केवळ संसद सदस्यांसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा एखादा नवीन सदस्य पहिल्यांदा भाषण करत असतो. तेव्हा, सर्वजण त्यांचा उत्साह वाढवत असतो, आजही तेच पाहायला मिळेल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील एक महिला आहेत. त्या उद्या बजेट घेऊन येत आहे. या अर्थसंकल्पाकडे भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. हा अर्थसंकल्प जगाच्या अर्थव्यवस्थेवरही प्रकाश टाकेल. मला आशा आहे की अर्थमंत्री सर्व अपेक्षा पूर्ण करतील.

आपला एकच विचार आहे, देश अगोदर, देशवासी अगोदर. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाद होतील आणि चर्चाही होईल. सभागृहात प्रत्येक मुद्द्यावर चांगली चर्चा होईल. या अधिवेशनात सर्व खासदार पूर्ण तयारीनिशी सहभागी होतील. हे सत्र आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या