Monday, November 25, 2024
Homeब्लॉगकर्नाटकी कौल कोणाला?

कर्नाटकी कौल कोणाला?

कर्नाटकातील मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत मोठा उत्साह दाखवल्याने 73 टक्के मतदान नोंदवले गेले. राज्यातील आतापर्यंतचे हे विक्रमी मतदान आहे. यातून सत्तापरिवर्तन घडणार का? चुरशीत लढल्या गेलेल्या कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. विजयाचा दावा करणार्‍या भाजप आणि काँग्रेसपैकी कोण सरस ठरतो? कर्नाटकी कौल कोणाला मिळतो? मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज किती खरे? याची उत्तरे मतमोजणी होऊन निकाल हाती आल्यावर मिळतील.

र्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान तीन दिवसांपूर्वी आटोपले. भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत तळपत्या उन्हाची पर्वा न करता मतदारांनी मतदानाला मोठा प्रतिसाद दिला. सुमारे 73 टक्के एवढे घसघशीत मतदान झाले. वाढलेल्या मतटक्क्याचा फायदा वा तोटा कोणत्या पक्षाला होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. कर्नाटकातील मतदार विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान करतात. दर निवडणुकीत आधीच्या मतदानाचा उच्चांक मोडला जात आहे. यावेळच्या निवडणुकीत 73 टक्के मतदान नोंदवले गेले. राज्यातील आतापर्यंतचे हे विक्रमी मतदान ठरले आहे. 2013 मध्ये 71 टक्के तर 2018 च्या निवडणुकीत 72.13 टक्के मतदान झाले होते. चुरशीत लढल्या गेलेल्या कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यंदाचे विक्रमी मतदान सत्तापरिवर्तन घडवते का? ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisement -

कर्नाटकात आम्हीच बहुमत मिळवणार, आमचीच सत्ता येणार, असे दावे-प्रतिदावे भाजप आणि काँग्रेस नेत्यांकडून केले जात आहेत. निवडणूक घोषित झाल्यावर अनेक संस्थांनी मतदानपूर्व चाचण्या घेऊन कानडी मतदारांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार यंदाच्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट होण्याचे भाकित वर्तवण्यात आले. मतदान आटोपल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या व संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात मतदारांनी सत्ताबदलाला पसंती दिल्याचे दिसते. म्हणजे भाजपला विश्रांती देऊन काँग्रेसकडे सत्ता सोपवण्याचा निर्णय मतदारांनी घेतल्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. काही सर्वेक्षणांत काँग्रेस आणि भाजपत मोठी चुरस दाखवण्यात आली आहे. निवडक संस्थांनी काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. बहुतेक अंदाजात भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी चुरस असल्याचे म्हटले आहे.

2024 ला होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील विरोधी पक्षांनी एकजुटीची भूमिका घेतली आहे. अशावेळी आत्मबल उंचावण्यासाठी कर्नाटकची निवडणूक जिंकणे भाजपसाठी आवश्यक आहे. काँग्रेसलादेखील या निवडणुकीत विजय मिळवणे आवश्यक वाटते. भाजपला आपण पराभूत करू शकतो याची खात्री विरोधी पक्षांना पटवून आपली राजकीय ताकद दाखवण्याची ही काँग्रेसला संधी आहे. भाजप व काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

2018 च्या कर्नाटक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. 104 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसला 78 तर जेडीएसला 38 जागा मिळाल्या होत्या.कोणत्याही पक्षाकडे बहुमताचा 112 हा जादुई आकडा नव्हता. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी संख्याबळाने तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या जेडीएसला काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला. दोन्ही पक्षांचे मिळून 116 आमदार होऊन बहुमताचा आकडा गाठला गेला. तथापि तत्कालीन राज्यपालांनी विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून सर्वप्रथम भाजपला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. त्यामुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सुनावणी झाली. युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. बी. एस. येडियुरप्पा यांनी 17 मे 2018 ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण हे सरकार अल्पायुषी ठरले.

बहुमत सिद्ध करता न आल्याने येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अवघ्या दीड दिवसाचे सरकार अखेर कोसळले. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात जेडीएस-काँग्रेस सरकार सत्तारूढ झाले. सरकार 14 महिन्यांचे झाले असताना काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार अस्थिर होऊ लागले. त्यानंतर आणखी काही आमदारांनी राजीनामे दिले. ही संख्या 15 वर पोहोचली. सरकार अल्पमतात आल्याने कुमारस्वामी सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली. अखेर बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय झाला. मात्र सभागृहात व बाहेरही गोंधळ सुरू असल्याने विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मते पडली. कुमारस्वामींनी राजीनामा दिल्यानंतर येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर आले, पण त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार 2021 मध्ये येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडले. बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले.

यावेळची विधानसभा निवडणूक भाजपने बोम्मई यांच्याच नेतृत्वात लढवली. प्रचार आघाडीवर स्थानिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान, गृहमंत्र्यांपासून अनेक केंद्रीय मंत्री व वरिष्ठ नेत्यांचाच बोलबाला दिसला. कर्नाटकातील प्रचाराची धुरा पंतप्रधानांनाच पेलावी लागली. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. रणरणत्या उन्हात 26 किलोमीटरची शोभायात्रा पंतप्रधानांनी काढली. भाजप आणि काँग्रेस नेत्यांकडून एकमेकांवर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. स्थानिक मुद्दे व जनतेचे प्रश्‍न प्रचारातून हरवले. पंतप्रधानांची शोभायात्रा आणि सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक आमदारांची तिकिटे कापल्याने यंदा भाजपत मोठ्या प्रमाणात बंडखोरी उसळली होती.

भाजपत घमासान सुरू असताना त्याचा लाभ उठवण्यासाठी काँग्रेसने भाजपतील नाराजांना आपल्याकडे आकर्षित केले. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार या आपल्या स्थानिक अनुभवी नेत्यांवर विश्‍वास टाकला. काँग्रेसच्या प्रचारसभांनासुद्धा मोठी गर्दी दिसून आली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षी निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतून झालेली वातावरणनिर्मिती काँग्रेससाठी फायदेशीर ठरली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ अनेक सभा घेतल्या. त्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. भाजप आणि काँग्रेसने आपापल्या जाहीरनाम्यांतून कर्नाटकी जनतेला भरभरून आश्‍वासने दिली. जेडीएसनेही दोन्ही पक्षांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकची निवडणूक तिरंगी दिसत असली तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच झाली.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशची सत्ता काँग्रेसने भाजपकडून खेचून आणली. गुजरातमधील मोठ्या विजयाच्या माहोलात हिमाचलचा पराभव झाकोळला. तथापि राष्ट्रीय अध्यक्षांचे राज्य हातून गेल्याचे दु:ख भाजप नेतृत्वाच्या मनात सलत असेल. कर्नाटकात भाजपविरोधी वातावरण असल्याच्या चर्चा असताना त्यावर मात करण्याची रणनीती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आखली व राबवली. पंतप्रधान मोदी यांच्याच नावावर भाजपने ही निवडणूक लढवली. ती रणनीती किती यशस्वी होते? मोदी नावाची जादू पुन्हा चालते का? ते निकालातून स्पष्ट होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या