नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध सुरू झाल्यानंतर अनेकदा इराणला धमक्या दिलेल्या आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेने इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला असून त्याची मुदत आज मंगळवारी रात्री ८ वाजता संपत आहे. त्यातच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सर्वात मोठी धमकी दिली आहे. आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल. जी पुन्हा आणली जाऊ शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मिडीयावर हा संदेश दिला आहे.
अमेरिका इराण युद्ध चिघळणार; खार्ग बेटावर अमेरिकेचा भीषण हल्ला, जगातील तेल पुरवठा खंडीण होण्याची भिती

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती. ही मुदत काही तासांत संपुष्टात येत आहे. दिवसभरात ट्रम्प यांनी इराणला अनेक इशारे दिले. मात्र काही वेळापूर्वी त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला असून आज रात्री मोठा विनाश होणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या संदेशमध्ये काय म्हंटले आहे?
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘Truth Social’ वर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलेय की, आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल. जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. असे व्हावे, अशी माझी इच्छा नाही. पण कदाचित ते होईलच. आता इराणमधील सत्ता बदलली आहे. आता तिथे आधीपेक्षा कमी कट्टरपंथी आणि स्मार्ट लोक आलेत. ते काही क्रांतीकारी पाऊल उचलतील का हे माहिती नाही. आज रात्री सगळं कळेल. हा जगातील ऐतिहासिक क्षण असेल. ४७ वर्षाचा भ्रष्टाचार, खंडणी आणि मृत्यूचे तांडव अखेर संपेल. ईश्वर महान आहे, त्यांची इराणी जनतेवरील कृपा कायम राहील असे ट्रम्प यांनी म्हटले. मला असे करायचे नव्हते परंतु कदाचित हेच होईल असे ट्रम्प यांनी सांगत इराणला धमकी दिली आहे.
सुरुवातीला ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती आणि त्या वेळेत सामुद्रधुनी खुली न केल्यास हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र जग या संघर्षाच्या निकालाची वाट पाहत असताना ट्रम्प यांनी तणाव कमी केला आणि मुदतवाढ दिली. आतापर्यंत ट्रम्प यांनी तीन वेळा मुदतवाढ दिली असून ही नवीन मुदत ८ एप्रिल रोजी संपत आहे. पहिला इशारा ४८ तासांचा होता, जो नंतर पाच दिवसांनी आणि त्यानंतर आणखी १० दिवसांनी वाढवण्यात आला. अशाप्रकारे मूळ ४८ तासांची मुदत आता एकूण ४०८ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.




