Monday, June 24, 2024
Homeशब्दगंधचित्रपटाचे उदाहरण का?

चित्रपटाचे उदाहरण का?

– ज्योत्स्ना पाटील

- Advertisement -

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की, मी चित्रपटाचेच उदाहरण का घेतले? त्यामागे अनेक कारणे आहेत. ती आपण पुढच्या एखाद्या लेखात पाहणारच आहोत. ‘पद्मावत’मधील ‘घुमर घुमर घुमे’ या गाण्यातील दीपिकाचे फूटवर्क पाहून तुम्हीही रीडिंग वर्क करायला सज्ज झाला असाल. वाचन हा सर्व विषयांचा आत्मा आहे. त्यामुळे वाचनाचा सराव करणे का आवश्यक आहे, ते तुमच्या लक्षात आले असेलच. चला तर मग मुलांनो, तुम्ही वाचन करत आहात हे जितके खरे आहे, तितकेच जाणूनबुजून केलेले म्हणजेच समजून उमजून केलेले वाचन अभ्यासाचा ताण सहजपणे दूर करत असते.

दीपिकाने जर फक्त कोरिओग्राफर करून दाखवतात तसेच नृत्य केले असते तर ‘घुमर घुमर घुमे’ हे गाणे पाहताना जितके चांगले वाटते तितके ते चांगले झाले असते का? अर्थातच नाही. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीच्या खोलात शिरत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीवर निर्विवाद वर्चस्व गाजवू शकत नाही. दीपिकाने कोरिओग्राफर (नृत्य संयोजक, नृत्य रचनाकार) ज्योती तोमर यांना वेळोवेळी प्रश्न विचारून प्रत्येक स्टेप्सचा अर्थ जाणून घेतला. ‘घुमर डान्स’ हा खरे तर लोकनृत्याचा प्रकार. नंतर हा डान्स राजघराण्यातील स्त्रिया करायला लागल्या आणि त्यात एक शास्त्रशुद्ध पद्धत आली.

राजघराण्यातील स्त्रिया हे नृत्य करू लागल्या त्यामुळे या गाण्यात चेहर्‍यावरील हावभाव हे संयमित असणे गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल, चेहर्‍यावरील हावभावांचा आणि आमच्या वाचनाचा काय संबंध? परंतु या दोन्ही गोष्टींचा संबंध खूपच जवळचा आहे. ‘घुमर घुमर घुमे’ या गाण्यातील दीपिकाचे चेहर्‍यावरील संयमित हावभाव गाण्याला एक विशेष उंची प्राप्त करून देतात. त्याप्रमाणेच तुमचे वाचन आरोह, अवरोह व विराम अशा शब्दोच्चारांच्या संयमित वाणीने झाल्यास तुम्हाला अभ्यासात आणि नंतर व्यवसाय, नोकरीत व इतर कोणाशीही सुसंवाद साधण्यास या बाबींचा निश्चितच उपयोग होईल. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणच घ्यायचे झाले तर उद्या पान नंबर 15 वाचून ये. या वाक्यातील शब्दांची जागा थोडी जरी इकडे तिकडे झाली तर काय होईल? ‘उद्या पान नंबर 15 वाचू नये.’ दोन्ही वाक्यांमध्ये फक्त ‘न’ या शब्दाची जागा थोडीशी इकडे तिकडे झाली तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. तीच गोष्ट वर्तुळाच्या परिघाचे सूत्र (दोन पाय आर), वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र (पाय आर वर्ग) यात तुम्ही जर वर्तुळाच्या परीघाचे सूत्र वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी वापरले तर काय होईल? संपूर्ण उत्तर चुकीचे येईल, कारण दोनची जागा बदलली नि उत्तर चुकले.

अगदी तसेच दीपिकाने तिच्या ‘घुमर घुमर घुमे’ या डान्समध्ये ‘घुमर घुमर घुमर घुमे’ असे म्हणत नृत्य करताना जर वरती पाहिले तर संपूर्ण गाण्यातली नजाकत चालली जाईल. ‘मारो बदिलो भँवर मन भावे’ या ओळीवर दीपिकाने केलेला दृष्टिक्षेप जर बदलला तर गाण्याची सूचकताच नाहीशी होईल. विज्ञानात रासायनिक अभिक्रिया लिहिताना बाण वरती असावा की खाली? बाणाची दिशा योग्य असेल तरच योग्य अभिक्रिया लक्षात येईल. दीपिकाने या गाण्यात केलेले संयमित हावभाव ‘घुमर घुमर घुमे’ या गाण्याला एक उंची प्राप्त करून देतात. मुलांनो, यावरून एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, ‘दिन’ या शब्दातली वेलांटी बदलली तर अर्थातच अनर्थ होईल. ‘दिन’ म्हणजे दिवस आणि दुसरा ‘दीन’ म्हणजे ‘गरीब’. त्याचप्रमाणे ‘रंग’ या शब्दातला अनुस्वार खाऊन टाकला तर काय होईल ‘रग’ आणि ‘रग’ म्हणजे घमेंड असा अर्थ होईल. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत असे अनेक शब्द आहेत त्यामुळे शब्दांचा अचूक व योग्य वापर केल्यास तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळून अभ्यास करण्यातली गोडी नक्कीच वाढेल.

पुढच्या लेखात अजून बरेच काही मेमरीत अपडेट करूया. तोपर्यंत इतर फाईल्स मेमरीत साठवून ठेवा.

तुमची,

ताई

- Advertisment -

ताज्या बातम्या