गरिबांबरोबरच श्रीमंतांची मुले देखील कुपोषित असल्याचा निष्कर्ष युनिसेफच्या एका अहवालात नमूद असल्याचे वृत्त माध्यमात आले आहे. त्यात पाच वर्षांच्या मुलांचे प्रमाण लक्षणीय आहे. फक्त गरिबांच्या मुलांमध्ये कुपोषण आढळते. आर्थिक उणिवांमुळे त्यांच्या मुलांना पुरेसा चौरस व पोषक आहार मिळू शकत नाही, असे मत मांडले जायचे.
उपरोक्त निष्कर्षानुसार तो भ्रम असल्याचे निष्पन्न झाले असे मानले जावे का? याचाच अर्थ श्रीमंत मुले जे खातात किंवा त्यांना खायला दिले जाते तो आहार परिपूर्ण नसावा असेच हा अहवाल सुचवतो. ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांबाबतची ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न सरकार करते. शाळांमध्ये पोषक आहार पुरवला जातो. यावर्षी मुलांना 15 प्रकारचे पोषक पदार्थ मुलांना दिले जाणार असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. अर्थात, पोषण आहार योजनाही अनेकदा वादाच्या भोवर्यात सापडते. पण निदान ही योजना राबवली जाते हेही नसे थोडके. पण श्रीमंत-सुखवस्तू किंवा ज्यांना त्यांच्या मुलांना पोषक किंवा चौरस आहार पुरवणे शक्य आहे त्याही कुटुंबातील मुलांच्या कुपोषणाचे काय? महाराष्ट्रीयन थाळी हा परिपूर्ण आहार मानला जातो. याला ‘ताट वाढणे’ असे संबोधतात.
कोणता पदार्थ किती प्रमाणत पोटात जावा याचाही समतोल ताट वाढताना साधला जातो. अनेक घरांमध्ये लहान मुलांना देखील ताट वाढण्याची पद्धत असायची. विविध चवींचे संस्कार व्हावेत, विविध पदार्थ चाखण्याची आणि ताटात वाढलेले सगळे पदार्थ खाण्याचे संस्कार मुलांवर त्यांच्या नकळत्या वयापासून व्हावेत हाच त्या मागचा प्रमुख उद्देश असायचा. ही प्रथा जवळपास मोडीत निघाल्याचे आढळते. पाच वर्षांच्या मुलाने काय खावे हे त्याचे पालकच ठरवू शकतात. तथापि पालकांच्याच खाण्याच्या सवयी बदलत असाव्यात का? अनेक पालकच थाळी खाण्याला नाके मुरडत असतील आणि चवबदल म्हणून चटकमटक खात असतील तर? त्यांच्या मुलांनाही तीच सवय लागली तर त्यात नवल ते काय? किती पालक मुलांना जाणीवपूर्वक फळे खाऊ घालतात? भारतात आहार संस्कृतीत कमालीची विविधता आढळते. तथापि ज्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा, वातावरणाचा, हवामानाचा प्रभाव स्थानिक आहारावर असतो याचाही विसर पालकांना पडत चालला असावा का? एखादेवेळी वेगळ्या चवीचा पदार्थ खाण्यात गैर काहीच नाही.
तथापि त्या त्या प्रदेशातील पदार्थांना स्वीकारण्याचा नादात मूळ पदार्थ मागे पडत चालले असावेत का? मुलांच्या कुपोषणामागे अशी अनेक कारणे संभवतात. थोडक्यात पाच वर्षांच्या आतील मुले कुपोषित आढळत असतील तर त्यासाठी त्यांच्या पालकांनाच जबाबदार मानले जाऊ शकेल का? पालक यावर विचार करतील का? आहार कुपोषणाबरोबरीने आहाराच्या वेळचे वातावरण, संचयी आणि त्यामुळे मुलांमध्ये वाढत जाणारे वैचारिक कुपोषण हा स्वतंत्र आणि चिंतेचा विषय ठरू शकेल.