शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे, त्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार वाढले आहेत. जगभरातील आतंकवादाकडे पाहिले तर 95 ते 99 टक्के आतंकवादी हे मुस्लिमच का असतात? असा जळजळीत सवाल श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी शिर्डीत उपस्थित केला.
बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी शिर्डीत आयोजित सकल हिंदू समाज निषेध सभेत ते बोलत होते. सभेपूर्वी सायंकाळी शिर्डी शहरातून भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. शेकडो हिंदू युवक, युवती आणि महिला हातात मशाली घेऊन या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या मोर्चाचे रूपांतर नंतर जाहीर सभेत झाले.
रामगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, भारतात राहून फिलिस्तीनचे नाव घेणार्या आणि संविधानाची शपथ घेणार्या ओवेसींना बांगलादेशातील दिपू दास या हिंदू तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले गेलेले दिसत नाही का? महाराजांनी यावेळी शालेय शिक्षणातील अहिंसेच्या शिकवणीवरही भाष्य केले. कोणी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा, असे आपल्याला चुकीचे शिकवले गेले. हा सर्वात मोठा षंढपणा आहे. आमचे धर्मशास्त्र असे सांगत नाही. शास्त्र सांगते की कोणावर अन्याय करू नका, पण अन्याय होत असेल तर तो सहनही करू नका. अन्यायाला प्रतिकार करणे हेच आपले कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी हिंदू समाजाला केले.
आम्ही सरसकट सर्वच मुस्लिमांच्या विरोधी नाही, पण जे स्वतःला सज्जन आणि राष्ट्रवादी मानतात, त्यांनी चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात का उभे राहू नये? जर तुम्ही अन्यायाचा निषेध करत नसाल, तर तुम्हीही तितकेच जबाबदार आहात, असेही महाराज म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘वंदे मातरम’ गीताने सभेची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या सभेमुळे शिर्डीत हिंदू समाजाची मोठी एकजूट पाहायला मिळाली.




