Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यापक्षी निरीक्षणासाठी लांब कशाला जायला हवे?

पक्षी निरीक्षणासाठी लांब कशाला जायला हवे?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पक्षी निरीक्षणाविषयी गैरसमजच जास्त आढळतात. त्यासाठी दूर जंगलात जावे लागते, दुर्बिणीसारखी साधने लागतात. पहाटे लवकर ऊठून जावे लागते असा अनेकांचा समज असतो. पण खरे सांगू का?

- Advertisement -

ठरवले तर पक्षी निरीक्षण तुमच्या घराच्या खिडकीत बसून सुद्धा करता येते. कारण आपल्या घराभोवती सुद्धा अनेक पक्षी दिवसभर बागडत असतात असा कानमंत्र नेचर क्लबचे अध्यक्ष आणि पक्षी निरीक्षक प्रा.आनंद बोरा यांनी दिला.

नाशिक जिल्ह्याला पक्ष्यांचा फार मोठा वारसा लाभला आहे. त्याचा अभ्यास आपण सर्वानी करायला हवा. पक्षी निरीक्षण सर्वाना जमू शकते. त्यासाठी दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. पहिली- तुम्हाला पक्ष्यांची आवड हवी. दुसरी-तुमच्याकडे पक्ष्यांची माहिती सांगणारे एखादे बेसिक छोटेसे पुस्तक हवे. पक्ष्यांचे जग खूप इंटरेस्टिंग असते.

तुमचे आणि पक्ष्यांचे मैत्र जडले की त्यांचे जग तुमच्यापुढे खुले होते. आपल्या घराच्या आजूबाजूला कावळे, चिमण्या, साळुंक्या, पोपट असे पक्षी सहज दिसत असतात. ते केव्हा दिसतात? त्यातील नर आणि मादी कोणती? त्यांच्या आकाराचे अजून कोणकोणते पक्षी दिसतात? ते पक्षी रोज ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी येतात का? पक्षी आंघोळ कशी आणि कधी करतात? पाण्यात डुंबतात की मातीत लोळतात? झाडांवर बसतात कि गवतावर? त्यांचा आकार, रंग, शेपूट, तिचा रंग, तुमच्या लक्षात आलेल्या त्यांच्या सवयी याची नोंद तुम्ही ठेवू शकता.

शक्य असेल तर फोटो काढू शकता. ती माहिती तुमच्या ओळखीच्या पक्षीमित्रांना देऊन त्या पक्षांची नावे शोधू शकता. तंत्रज्ञानाने हे काम फार सोपे केले आहे. अनेक अँप आणि वेबसाईट आहेत. ज्यावरून तुम्ही स्वतः सुद्धा ही माहिती शोधू शकता. मई बर्डफ नावाची वेबसाईट आहे. भारतात कुठेही पक्षी दिसला तर त्याची नोंद या वेबसाईटवर करता येते. ती नोंद आपल्या नावाने होते. त्यावरून आपल्याला माहिती मिळते. अशा पद्धतीने तुम्ही तयार झालात की तुम्ही एखाद्या जाणकार पक्षी मित्राबरोबर जंगलात पक्षी निरीक्षण करायला जाऊ शकता. साधनेही घेऊ शकता. त्यावेळी काय दक्षता घ्यावी लागते हे समजत जाते.

पक्षांच्या मजेशीर सवयी माहिती झाल्या की इंटरेस्ट वाढत जातो. एक उदाहरण सांगतो. पक्ष्यांमध्ये नर दिसायला सुंदर असतात. सुगरण पक्षी सर्वानाच माहिती आहे. नर तीन घरटी अर्धवट बांधून ठेवतो. मग सुगरण मादी त्या तिन्ही घरट्याना भेट देते. पाहणी करते. तिला जे घरटे पसंत पडेल ते घरटे नर बांधून पूर्ण करतो आणि मग मादी त्यात अंडी घालते.

अशा गोष्टी पक्षी निरीक्षणात रस वाढवतात. माणसाचे अस्तित्व टिकायचे असेल तर पक्षीही टिकलेच पाहिजेत. जैवविविधतेच्या साखळीत पक्षीही महत्वाचे आहेत. त्यांचे रक्षण आणि संवर्धन याची जबाबदारी तरुणाईची आहे. हा वारसा सर्वानी मिळूनच पुढे न्यायला हवा. आपल्या मुलांमध्ये पालकांनी पक्षी निरीक्षणाच्या सवयी जाणीवपूर्वक रुजवायला हव्या. निसर्गाप्रती त्यांना संवेदनशील बनवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या