Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधथंंडी का वाजते?

थंंडी का वाजते?

ज्यांच्या सहाय्याने आपल्याला आपल्या सभोवतीच्या वातावरणाची जाणीव होते, ती म्हणजे आपली पाच ज्ञानेंद्रिये. नाक, कान, जीभ, डोळे व त्वचा यांच्या सहाय्याने आपल्याला अनुक्रमे वास, आवाज, चव, दृष्टी व स्पर्श यांची जाणीव होते. आजच्या लेखात आपण त्वचेशी संबंधित जी स्पर्श संवेदना असते त्यातील थंडी वाजणे याबद्दल माहिती पाहू.

डॉ. अश्विनी गिरीश चाकूरकर

त्वचेमार्फत आपल्याला वेगवेगळ्या मार्गाची जाणीव होते. जसे थंड, गरम, खरखरीत, मऊ, मुलायम इत्यादी. शरीर सहसा बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेत असते व स्वत:चे तापमान त्यानुसार नियंत्रित ठेवत असते.

- Advertisement -

थंडी म्हटले की, गुलाबी थंडी, बोचरी थंडी, गारठवून सोडणारी थंडी अशा प्रकारची अगदी आल्हाददायक, हवीहवीशी वाटणारी ते त्रासून टाकणारी थंडी आपल्याला आठवते. ऋतूनुसार होणार्‍या तापमानातील बदलानुसार साधारण हेमंत शिशिर ऋतूत ही थंडी आपण अनुभवतो. ही थंडी सर्वांना सारखीच जाणवते का? तर नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार थंडीची जाणीव ही वेगळी असते. जसे वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तीस जाणवणार नाही. ही सर्वसाधारणपणे जाणवणारी बाब आहे. परंतु काही व्यक्तींना इतरांपेक्षा थंडी जरा जास्तच वाजते. तर याचा त्या व्यक्तीच्या आरोग्याशी काही संबंध असतो का?

अशा कोणत्या अवस्था आहेत की ज्यात थंडीची जाणीव जास्त प्रमाणात होते? थंडी वाजून येणे (थरथरणे) हे स्नायूंच्या आकुंचन व प्रसरण यांच्या जलद बदलामुळे होते. हे स्नायूंचे आकुंचन म्हणजे आपल्या शरीराचे तापमान कमी असताना ते वाढवण्याचा आपल्या शरीराचा मार्ग आहे.

ऋतूनुसार वातावरणात थंडी असेल अशावेळी, वातानुकूलित ठिकाणी आपण असल्यामुळे थंडी जाणवते. किंवा हातपाय थंड जाणवणे हे साहजिक आहे. परंतु इतर सामान्य वेळी थंडी वाजणे हे काही आजारांचे लक्षण असू शकते.

आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहील, अशी रचना आपल्या शरीरात कार्यरत असते. जेव्हा वातावरण उष्ण असते तेव्हा घाम येऊन त्याद्वारे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते. जेव्हा बाहेरील वातावरण थंड असते तेव्हा रक्तप्रवाह (ब्लड सर्क्युलेशन) अधिक प्रभावीपणे होऊन हे संतुलन राखले जाते. त्वचेखाली असलेले थर्मोरिसेप्टर व मेंदूतील हायपोथॅलमसद्वारे हे संतुलन राखले जाते. थंड वातावरणात हातापायातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व त्यामुळे हातपाय थंड जाणवतात हे सामान्यपणे आढळते.

थंडी जास्त प्रमाणात जाणवण्याची कारणे/अवस्था.

थंड वातावरणाचा संपर्क : अतिशय थंड ठिकाण असेल. थंडीचा ऋतू असेल अथवा तुम्ही भिजल्यामुळे अधिक काळ ओल्या कपड्याच्या संपर्कात राहिल्यास थंडी वाजू शकते.

* औषधांचा दुष्परिणाम : काही औषधांचे साईड इफेक्ट, अ‍ॅलर्जी किंवा चुकीच्या डोसमुळेदेखील थंडी वाजून येऊ शकते.

* तीव्र शारीरिक हालचाली : काही मैदानी खेळ ज्यात जलद शारीरिक हालचाल आवश्यक असते. अशावेळी शरीराच्या तापमानात वेगाने बदल होऊ शकतो. जसे जास्त तापमानात डिहायड्रेशनमुळे तसेच कमी तापमानात हायपोथेरेमिया व डिहायट्रेशनमुळे थंडी वाजून येणे हे लक्षण जाणवू शकते.

* जंतू संसर्ग (इन्फेक्शन) : थंडी वाजून येणे अनेकदा तापाशी संबंधित असते. तरी नेहमीच नसते. काही वेळा ते ताप येण्यापूर्वी होते. विशेषत: ताप जर एखाद्या इन्फेक्शनमुळे आला असेल तर कारणानुसार थंडी वाजणे हे लक्षण तीव्र किंवा सौम्य असू शकते.

हायपोेथॉयरायडिझम : या अवस्थेत थायरॉईड ग्रंथी चयापचय दर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक संप्रेरक (हार्मोन्स)तयार करत नाहीत. या स्थितीमुळे थंडीची संवेदना वाढू शकते. ज्यामुळे थंडी वाजते.

हायपोेग्लेसिमिया

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण असामान्यपणे कमी होते तेव्हा हायपोग्लेसिमिया जाणवतो. या अवस्थेतील लक्षणांपैकी एक म्हणजे थरथरणे किंवा स्नायू कमकुवत होणे.

कुपोषण : ज्या व्यक्तींमध्ये योग्य पोषक आहाराच्या अभावामुळे लोहाची, प्रथिनांची व्हिटॅमिन बी इत्यादींची कमतरता असते अशा व्यक्तींनाही सतत थंडी वाजणे हे लक्षण आढळते. लाल रक्तपेशींमार्फत (ब्लड सर्क्युलेशन) ऑक्सिजन शरीरात सर्वत्र पोहोचवण्याचे काम लोहामार्फत केले जाते. त्यामुळे शरीराचे पोषण योग्य प्रकारे झाले पाहिजे.

भावनिक प्रतिक्रिया : एखाद्या परिस्थितीवर आपली तीव्र भावनिक प्रतिक्रिया असल्यास थंडी वाजून येऊ शकते. जसे भीती, चिंता इ. आपल्या खोलवर सकारात्मक भावना जागृत करणार्‍या घटनांमुळेही आपल्याला थंडी वाजते. जसे संगीत ऐकणे, प्रेरणादायी शब्द ऐकणे. ज्याला आपण रोमांच उभे राहणे असे म्हणतो.

आतापर्यंतच्या वाचनात आपल्याला लक्षात आलेच असेल की, थंडी ही प्राकृत/नैसर्गिक स्वरुपात जाणवणे ही आल्हाददायक जाणीव असते आणि तीच थंडी विकृत स्वरुपात, थंडी वाजून येणे अशी जाणवू शकते जी खूप त्रासदायक असते. त्यामुळे जी कारणे/अवस्था आपण बघितल्या की ज्यात थंडीचा असा त्रास वाटू शकतो ती टाळण्यासाठी आपण आरोग्यदायी संतुलित जीवनशैली अंगिकारली पाहिजे. उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली पाहिजे. चला तर मग ही थंडी गुलाबी अन् आल्हाददायकच वाटावी असे प्रयत्न आपण करू. धन्यवाद.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या