Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्यानवीन अध्यक्ष झाला तर का नको? - शरद पवारांच्या निर्णयाला अजितदादांचे समर्थन

नवीन अध्यक्ष झाला तर का नको? – शरद पवारांच्या निर्णयाला अजितदादांचे समर्थन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते भावनिक झाले होते. सर्व नेते, कार्यकर्ते हे पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा म्ह्णून भावनिक साद घालत असताना अजित पवार यांनी मात्र पवारांच्या निर्णयाचे समर्थन केले. हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. त्यांनी वयाचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. जर नवीन अध्यक्ष झाला तर का नको? असा सवाल केला. साहेब स्वत:च म्हणाले होते भाकरी फिरवावी लागेल. साहेब नव्या अध्यक्षाला सर्व शिकवतील. पदाचा राजीनामा दिला असला तरी ते आपल्यासोबतच आहेत. देशात आणि महाराष्ट्रात ते फिरतीलच, असे अजित पवार म्हणाले. अजितदादांच्या या भूमिकेने उपस्थित सर्वांना धक्का बसला. परंतु, त्याचवेळी काही पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या भूमिकेला त्यांच्या समक्ष विरोध करत त्यांना दोन शब्द सुनावले.

अजित पवार यांनी यावेळी काँग्रेसचे उदाहरण दिले. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अध्यक्षपदाची जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवली आहे. तरीही काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी याच नेत्या आहेत, याचा दाखला अजित पवार यांनी यावेळी दिला. त्याला पदाधिकारी नसीम सिद्दीकी यांनी आक्षेप घेत काँग्रेसची देशभरात काय स्थिती आहे, याची माहिती दिली. काँग्रेसची सध्याची स्थिती दयनीय आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे, असे सिद्दीकी यांनी अजितदादांना सुनावले.

दरम्यान, कोणीही भावनिक होण्याची आवश्यकता नसल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, पक्षाचा जो कोणी अध्यक्ष होईल तो देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. आपण गैरसमज करून घेताय की ते अध्यक्ष नाही म्हणजे ते पक्षात असे नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत, पण काँग्रेस सुरू आहे. वयाचा विचार करता साहेब आणि सगळयांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे ही जबाबदारी देऊ पाहत आहेत. साहेब हेच पक्ष आहेत. पवारसाहेबांनी निर्णय घेतलाय तो ते बदलणार नाहीत. ते अध्यक्ष असो वा नसो आपला परिवार असाच चालत राहणार आहे. भावनिक होऊ नका. तेच म्हणाले होते भाकरी फिरवावी लागेल. मी काकींशी पण बोललो त्या पण म्हणाल्या की साहेब निर्णयावर ठाम आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष काम करेल. त्याला आपण सगळे साथ देऊ.

घरात पण वडीलधारी माणसे वय झाल्यानंतर नवीन लोकांना शिकवत असतात. त्या प्रमाणे गोष्टी होतील ना. कोणीही अध्यक्ष होऊ देत साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. साहेबांनी भाषणात अचानक घोषणा केली हा सगळयांना धक्का होता. पण काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. नवीन अध्यक्ष जर झाला तर का नको तुम्हाला. साहेब नव्या अध्यक्षाला सर्व बारकावे समजावून सांगतील ना. साहेब देशात, महाराष्ट्रात फिरणारच आहेत. त्यांचे मार्गदर्शन होणारच आहे. नवा अध्यक्ष,कार्यकारिणी साहेबांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहे. हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. साहेब १ मेलाच निर्णय जाहीर करणार होते. पण काल आघाडीची वज्रमूठ सभा होती. मिडियात हेच चालले असते. त्यामुळे हा निर्णय आज घोषित केला, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. या माहितीमुळे शरद पवार यांचा निर्णय हा अजित पवार यांना माहित होता, हे स्पष्ट झाले.

सुप्रिया तू बोलू नकोस

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा सगळा भावनिक प्रसंग सुरू होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आपल्या भावना व्यक्त करत होते. सुप्रिया सुळे यांनी देखील बोलावे अशीच भावना होती. मात्र अजित पवार यांनी त्यावेळी सुप्रिया सुळे यांना बोलू दिले नाही. सुप्रिया तू बोलू नकोस, मी तुला मोठ्या भावाच्या अधिकारवाणीने बोलत आहे असे अजितदादा म्हणाले. त्यामुळे सुप्रिया सुळे शांत राहिल्या.

दरम्यान, सध्याच्या घडीला देशाला पुरोगामी नेत्यांची गरज आहे. त्यामुळे आपण सक्रिय राजकारणातून बाहेर पडू नका. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे आम्हाला पोरके करू नका, असे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. तर तुम्ही आजही आमच्यापेक्षा दसपट काम करता. तुमच्या नेतृत्वाची आम्हाला आणि देशाला गरज आहे. तुम्ही घेतलेल्या राजीनाम्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयुष्यभर तुम्ही म्हणालात तसे वागलो आहोत. यापुढे आम्ही वागू. समिती आम्हाला मंजूर नाही. तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच आमची समिती. त्यामुळे तुम्ही काम करु नका पण पदावर रहा, अशी भावनिक साद छगन भुजबळ यांनी घातली. आपल्या राजीनाम्याचा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयाने आम्हाला धक्का बसला आहे. आपल्या विना आमचे जीवन व्यर्थ आहे. आम्हाला वटवृक्षाची छाया आवश्यक आहे, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.

तर आमचे राजकीय जीवन तुमच्यामुळेच घडले आहे. तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. तुमच्या या निर्णयाने आम्ही स्तब्ध झालो आहोत, अशी भावना हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवली. आपण वेगवेगळ्या समाजासाठी भरीव कार्य केलेले आहे. त्यांच्यासाठी आधार उभा करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल याची काळजी घेतलीत. सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज असून केवळ आपणच विरोधकांना एकत्र आणू शकता. त्यामुळे आपला राजीनाम्याचा निर्णय आम्हाला अजिबात मान्य नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी संगितले. तर आपल्या भावना व्यक्त करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजीया खान, माजी आमदार विद्या चव्हाण, हेमंत टकले यांच्यासह माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुलींनी शरद पवार यांना राजीनाम्याचा फेरविचार करावा, अशी विनंती केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या