Saturday, January 24, 2026
Homeक्रीडाShubman Gill : टी-20 विश्वचषक संघातून शुभमन गिलचा पत्ता का कट झाला?

Shubman Gill : टी-20 विश्वचषक संघातून शुभमन गिलचा पत्ता का कट झाला?

मुंबई । Mumbai

आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज अधिकृतपणे भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघ निवडीमध्ये एक मोठा निर्णय घेत निवडकर्त्यांनी अनुभवी फलंदाज आणि एकदिवसीय-कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याला संघातून वगळले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी संघाची घोषणा केली, तेव्हा गिलचे नाव यादीतून गायब असल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शुभमन गिलला डच्चू मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर निवड समितीने त्याच्या अलीकडच्या काळातील खराब कामगिरीवर शिक्कामोर्तब करत त्याला विश्वचषकाच्या ताफ्यातून बाहेर ठेवले आहे. या निर्णयामागे नेमकी काय कारणे आहेत, याची ‘इनसाईड स्टोरी’ आता समोर आली आहे.

YouTube video player

शुभमन गिलच्या गेल्या १८ टी-२० सामन्यांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्याचे अपयश स्पष्टपणे दिसून येते. या १८ सामन्यांमध्ये गिलला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने २८ चेंडूत ४७ धावांची एक आश्वासक खेळी खेळली होती, ज्याने भारताला विजय मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर सलामीला किंवा टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना तो सातत्याने अपयशी ठरला आहे. मोठ्या धावसंख्या उभारण्यात त्याला आलेले अपयश हे त्याच्या निवडीमधील सर्वात मोठा अडथळा ठरले.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, गिल सध्या धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. तसेच मागील विश्वचषकातही त्याचा सहभाग नसल्यामुळे ताजी रणनीती आखताना त्याच्या नावाचा विचार झाला नाही. दुसरीकडे, टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने गिलला वगळण्यामागे ‘फॉर्म’ पेक्षा ‘संघरचना’ हे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले. सूर्या म्हणाला, “शुभमनला केवळ त्याच्या कामगिरीमुळे वगळण्यात आलेले नाही, तर संघाला वरच्या फळीत एका यष्टीरक्षक-फलंदाजाची (Wicketkeeper-Batsman) गरज होती. संघाचे संतुलन राखण्यासाठी आम्हाला एका यष्टीरक्षकाला सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर संधी देणे अनिवार्य होते.”

सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषकात गिलकडे पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी होती, परंतु तिथेही त्याला प्रभाव पाडता आला नाही. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतही गिलची कामगिरी सरासरीपेक्षा खाली होती. या मालिकेतील तीन सामन्यांत त्याने अनुक्रमे ४, ० आणि २८ अशा माफक धावा केल्या. लखनौ येथील सामना पावसामुळे रद्द झाला, तर मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. एकूणच सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव आणि यष्टीरक्षक फलंदाजाची निकड यामुळे शुभमन गिलला विश्वचषकाच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले आहे.

टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंह, इशान किशन (यष्टीरक्षक).

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...