नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराणमधून कच्च तेल घेऊन येणारा टँकर भारताऐवजी चीनकडे रवाना झाल्याचे वृत्त शुक्रवारी वाऱ्यासारखे पसरले. पैशांच्या व्यवहारामुळे हा टँकर चीनकडे वळाला असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, गुजरातच्या वाडिनार बंदराकडे निघालेले इराणचे कच्चे तेल वाहून नेणारे जहाज (ऑइल टँकर) पेमेंटच्या समस्येमुळे मध्यंतरीच चीनकडे वळवण्यात आल्याच्या वृत्ताचे भारताने शनिवारी खंडन केले आहे.
कॅप्लर सारख्या कंपन्यांनी ‘पिंग शुन’ नावाचा टँकर गुजरातच्या वाडीनार ऐवजी चीनकडे जात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर, मंत्रालयाने स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय तेल व्यापारात जहाजांचा मार्ग बदलणे ही एक सामान्य प्रक्रिया असून, याचा पुरवठ्याशी संबंध जोडणे चुकीचे आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने काय म्हंटले?
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत स्पष्ट केले की, पेमेंटच्या अडचणींमुळे जहाजाचा मार्ग बदलल्याचे दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत. इराणकडून कच्च्या तेलाच्या आयातीसाठी कोणतीही पैशांची अडचण नाही आणि भारतीय रिफायनर्स विविध जागतिक पुरवठादारांकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवणार आहेत.
मंत्रालयाने म्हटले आहे की, “भारत ४० हून अधिक देशांतून कच्च्या तेलाची आयात करतो. व्यावसायिक गरजांनुसार विविध स्त्रोतांकडून तेल घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कंपन्यांना आहे. मध्यपूर्वेतील पुरवठा विस्कळीत झाला असतानाही, भारतीय रिफायनर्सनी इराणसह इतर ठिकाणांहून आपली गरज सुरक्षित केली आहे.”
एलपीजी तुटवड्याच्या अफवा थांबवण्यासाठी मंत्रालयाने सांगितले की, ४४ टीएमटी इराणी गॅस घेऊन आलेले ‘सी बर्ड’ जहाज २ एप्रिलला मंगळूर बंदरात सुखरूप पोहोचले आहे. व्यावसायिक लवचिकता आणि बाजारातील परिस्थितीनुसार समुद्रातील जहाजे आपले गंतव्यस्थान बदलू शकतात, ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे.
२०१८ मध्ये अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध लादल्यानंतर भारताने मे २०१९ पासून इराणकडून होणारी तेल आयात पूर्णपणे थांबवली. एकेकाळी भारताच्या एकूण तेल आयातीमध्ये इराणचा वाटा ११.५ टक्क्यांपर्यंत होता. २०१८ मध्ये भारत दररोज ५ लाख १८ हजार बॅरल तेल इराणकडून खरेदी करत असे, मात्र २०१९ मध्ये हे प्रमाण झपाट्याने घटून २ लाख ६८ हजार बॅरलवर आले. सध्या भारत इराणऐवजी पश्चिम आशिया, अमेरिका आणि इतर देशांकडून आपली तेलाची गरज पूर्ण करत आहे.
कॅप्लर या प्रसिद्ध ट्रॅकिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘पिंग शुन’ नावाचा एक अफ्रामॅक्स टँकर सध्या चर्चेत आहे. हे जहाज ४ मार्च रोजी इराणच्या खार्ग बेटावरून सुमारे ६ लाख बॅरल तेल घेऊन निघाले आहे. विशेष म्हणजे, हे जहाज अमेरिकेच्या निर्बंधांच्या कक्षेत आहे. सुरुवातीला या जहाजाचे गंतव्यस्थान गुजरातचे वाडीनार बंदर असल्याचे सांगण्यात आले होते आणि ४ एप्रिल ही पोहोचण्याची अंदाजित वेळ होती. मात्र, आता जहाजाचे रडार गुजरातऐवजी थेट चीनमधील डोंगयिंग हे ठिकाण दाखवत आहे. कॅप्लरच्या मते, तांत्रिक यंत्रणेत नोंदवलेले ठिकाण अंतिम नसू शकते, प्रवासादरम्यान त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





