अहिल्यानगर (प्रतिनिधी)
इतर व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा बनाव रचल्याचा प्रकार अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी, फिर्यादी पत्नी, तिचा पती, वडील, सासू आणि सासरे अशा एकूण पाच जणांविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.
तुकाराम महादेव यादव, सुमन तुकाराम यादव, महादेव सावळेराम यादव (सर्व रा. हातवळण, ता. अहिल्यानगर), रामदास उध्दव सोनसाळे, सिंधुबाई रामदास सोनसाळे (दोघे रा. शेंडी, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २५ ऑक्टोबर रोजी हातवळण येथून तुकाराम यादव याचे अपहरण झाल्याची फिर्याद त्याची पत्नी सुमन हिने अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
मात्र, तपासात पोलिसांना वेगळाच संशय आला. तुकाराम यादव याचे मुळात अपहरण झालेच नव्हते. त्यानेच हा संपूर्ण बनाव रचला आणि यामध्ये त्याची पत्नी सुमन, वडील महादेव यादव, सासरे रामदास सोनसाळे व सासू सिंधुबाई सोनसाळे यांनी त्याला साथ दिली. या सर्वांनी संगनमत करून तुकाराम याला लपून राहण्यास मदत केली. एवढ्यावरच न थांबता, सुमन यादव हिने पोलीस ठाण्यात गणेश कवडे, माऊली पठारे, सुनील दिलीप पठारे व अक्षय भंडारे यांनी आपल्या पतीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने उचलून नेले, अशी खोटी माहिती दिली.
या चौघांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी व त्यांचे मोठे नुकसान व्हावे, याच उद्देशाने हा संपूर्ण खोटा कट रचण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक धुमाळ यांनी स्वतः याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.




