राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने अखेर झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरात 14 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. अजय संतोष मुंगसे (वय 18) हा तरुण राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे राहतो. त्याची मयत आई कविता आणि वडील संतोष यांच्यासह राहतो. अजयचे वडील संतोष रामदास मुंगसे हा सतत पत्नी आणि मुलाला काही कारण नसताना मारहाण करत असे. 13 जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान संतोषने काहीही कारण नसताना पत्नीला लाथा-बुक्याने मारहाण केली.
त्यानंतर पुन्हा 14 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता संतोषने पत्नी कविता यांना मारहाण केली. त्यावेळी कविता ह्या घरातून बाहेर निघून गेल्या. आणि त्यांच्या ब्राम्हणी शिवारातील शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुपारी 4 वाजता घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर ब्राम्हणी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांचा पती संतोष हा गुपचूप कोणाला काही न सांगता पसार झाला होता. त्यानंतर पोलिस पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला गजाआड केले.
या घटनेबाबत मुलगा अजय मुंगसे यांच्या फिर्यादीवरून त्याचे वडील आरोपी संतोष रामदास मुंगसे, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. 787/2025 भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 351 (2), 352 प्रमाणे प्रमाणे मारहाण व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.




