Saturday, May 18, 2024
Homeनगरपत्नीचा छळ करणार्‍या पतीची शिक्षा अपिलात कायम

पत्नीचा छळ करणार्‍या पतीची शिक्षा अपिलात कायम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पती नीलेश कृष्णा फल्ले (रा. पाटील गल्ली, भिंगार) यास एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी ठोठावली होती. आरोपी नीलेश फल्ले याने जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी कनिष्ठ न्यायालयाची ही शिक्षा अपिलात कायम ठेवली आहे. विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे- शिंदे यांनी अपिलात सरकारतर्फे काम पाहिले.

- Advertisement -

नीलेश याचा 11 मे 2013 रोजी विवाह झाला. त्याने पत्नीला दोन- तीन महिने चांगले नांदविले. त्यानंतर ऑफिससाठी दीड लाख रुपये माहेरावरून आणावेत, यासाठी छळ सुरू केला. माहेरावरून पैसे आणावेत, यासाठी घरातून हाकलून दिले. नातेवाईकांनी समजावून सांगितले. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांचे सांगण्यावरून ती पुन्हा सासरी नांदायला गेली. नीलेश फल्ले याने पुन्हा हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरूवात केली. नीलेश याने 9 मे 2013 रोजी दोन लाख रुपये आणण्यासाठी पत्नीला मारहाण केली. त्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पती नीलेश याच्याविरूध्द हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्यात फिर्यादी, तिचा भाऊ, मामा आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्याचा निकाल 9 जानेवारी 2018 रोजी लागला. नीलेश यास दोषी धरण्यात येऊन त्याला शिक्षा ठोठावली होती. त्याने या शिक्षेविरूध्द अपिल दाखल केले होते. न्यायालयाने अपिलात कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. अ‍ॅड. केळगंद्रे- शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या