मुंबई | प्रतिनिधी Mumbai
विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याइतपत महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आहे. राज्यात आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे २३ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी मतदान झाले. राज्यभरात ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. मतदानानंतर विविध संस्थांनी मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या निष्कर्षांवर राऊत यांनी जोरदार टीका केली. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष हा फ्रॉड आहेत. लोकशाहीत मतदान गुप्त असते. लोक मनातली गोष्ट मांडतातच असे नाही. महाराष्ट्रातही यावेळी असेच झाले आहे. त्यामुळे सर्वेक्षण करून कोण जिंकणार, कोण हरणार हे कसे सांगतात. हरयाणामध्येही काँग्रेस ६० जागा जिंकेल असा एक्झिट पोल सांगण्यात आला होता. लोकसभेला मोदी ४०० पार जातील अशा प्रकारचा एक्झिट पोल तयार करून घेतला होता. पण प्रत्यक्षात काय झाले हे सर्वांनीच पाहिले आहे, असे राऊत म्हणाले.
एक्झिट पोलवर विश्वास ठेऊ नये.आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा देखील संशोधनाचा विषय आहे. लोकांनी केलेले मतदान गुप्त असते. तरीही काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण २३ तारखेला निकाल लागेल आणि २६ तारखेला महाविकास आघाडी सत्तेत येईल. मात्र, २३ तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्तास्थापनेचा दावाही करू शकतो, असे सांगतानाच आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे त्याच दिवशी संध्याकाळी सांगेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या येतात की कुलुप येणार हे ७२ तासांनी ठरेल, असेही ते म्हणाले.
ही निवडणूक पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेली. राज्यातील जनतेने पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी मतदान केले, असा दावा संजय यांनी यावेळी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा