तीव्र पाणीटंचाई सातत्याने जाणवणार्या देशांमध्ये भारत जगात तेराव्या क्रमांकावर आहे. 2030 पर्यंत जगातील 21 शहरांमधील भूजल साठा पूर्णपणे संपुष्टात येणार असल्याचा काही सर्वेक्षणांचा निष्कर्ष माध्यमात जाहीर झाला आहे. मोसमी पाऊसही लहरी बनत आहे. पावसाचे दिवस कमी झाले आहेत. काही दिवसात प्रचंड पाऊस पडत असल्याचा लोकांचा अलीकडच्या काळातील अनुभव आहे. जलसंवर्धन हाच त्यावरचा व्यवहार्य उपाय असल्याचे तज्ञांचे मत आहे. नाशिक जिल्हा परिषदेने ‘मिशन भगीरथ’ हाती घेतले आहे. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह 26 जणांच्या समुहाने जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानचा अभ्यास दौरा केला. या दौर्यात त्यांनी अलवार परिसरातील जलसंधारण कामांना भेटी दिल्या. कामाच्या पद्धती आणि लोकसहभागाचे महत्व जाणून घेतले. काही यशोगाथाही अभ्यासल्या. आता नाशिक जिल्ह्यात ‘मिशन भगीरथ’ राबवले जात आहे. पहिल्या टप्प्यात पेठ आणि सुरगाणा तालुक्यात कामे सुरु झाली आहेत. या दोन तालुक्यांसह त्र्यंबकेश्वर आणि कळवण तालुक्यातून रोजीरोटीसाठी ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. ‘भगीरथ मिशन’च्या कामांचा स्थलांतर रोखण्यासाठी उपयोग होणार असे संबंधित अधिकार्यांचे म्हणणे आहे. सरकारी कामकाजाची पद्धत ठरलेली असते. त्या पद्धतीवर लोक फारसे समाधानी नसल्याचे आढळते. सरकारी कामातील मानवी चेहरा हरवत चालल्याचा अनुभव लोकांना येतो. अशावेळी नाशिक जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि सेवकांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे आणि जागरुकतेचे लोक कौतुक करतील. काम प्रामुख्याने जलसंधारणाचे असले तरी यानिमित्ताने लोकांचे मुख्य प्रश्न संबंधितांच्या लक्षात येतील. ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर पुढाकार घेतला जाईल अशी अपेक्षा लोकांनी करावी का? लोकसहभागाशिवाय शाश्वत विकास शक्य नाही हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही सरकारी कामात लोकसहभागाचे महत्व राजेंद्र सिंह वारंवार विशद करतात. त्यांनी राजस्थानमध्ये केलेल्या जलक्रांतीचा मुख्य आधार लोकसहभाग हाच आहे. अलवार परिसरातील कामांच्या अभ्यासातून अधिकार्यांनी तोच निष्कर्ष काढला आहे. लोकसहभागाचे अनेक फायदे होऊ शकतील. एरवी सरकारी कामांशी जनतेचा संबंध नसतो, असा भ्रम आढळतो. तथापि जलसंधारणाच्या कामातील सक्रिय लोकसहभाग लोकांमध्ये त्या कामाविषयी आपुलकी वाढवू शकेल. मालकी हक्काची भावना जागृत होऊ शकेल. कामाच्या दर्जावर लोक लक्ष ठेवू शकतील. कामे पूर्ण झाल्यावर त्याची देखभाल जागरुक लोकांचे समूह करु शकतील. पाण्याची उपलब्धता आणि वापर याविषयी समाजात जागरुकता निर्माण होण्यास मदत होऊ शकेल. सद्यस्थितीत त्याची नितांत आवश्यकता आहे. लोकशाहीत लोकही व्यवस्थेचा अमूल्य भाग आहेत ही जाणीव लोकांमध्येही रुजण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भगीरथ मिशन सारखे उपक्रम सहाय्यभूत ठरु शकतील.