अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जून महिना संपत आला. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून मोठ्या पावसाने उघडीप दिल्याचे चित्र असून खरिप हंगामात आतापर्यंत 65 टक्क्यांपर्यंत पेरण्या झालेल्या असून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि अधूनमधून होणारी पावसाची भूरभूर (शॉवर पाऊस) यामुळे पिके तहानली असून काही ठिकाणी शेतकरी भर पावसाळ्यात पिकांना पाणी देतांना दिसत आहे. जिल्ह्यात एक लाखांहून अधिक हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असून आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात यंदा धुमधडाक्या पावसाने सुरूवात केली. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक होते. तर जिल्ह्याच्या उत्तर भागात अजूनही अनेक तालुक्यात पावसाने सरासरीच्या 60 टक्के पावसाची सरासरी ओलांडलेली नाही. जून महिन्यांत नाशिक जिल्ह्यासह मूळा, भंडारदार, निळंवडे धरणाच्या पाणलोटात पावसाच्या दमदार हजेरीमूळे धरणसाठ्यात वाढ झालेली असली तरी जिल्ह्याचा उर्वरित भागत कोरडा असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील 4 लाख 51 हजार हेक्टवर पिकांची पेरणी पूर्ण झालेली असून जिल्ह्याच्या दक्षिण भागात पेरणीचे प्रमाण अधिक आहे.
यासह जिल्ह्यात 1 लाख 10 हजार हेक्टवर कपाशी लागवड झालेली असून खरीप हंगामातील पिके आता तहानली असल्याचे दिसत आहे. जूनच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात मोठा पाउस झालेला नाही. यामुळे अनेक भागात सध्या शेतकरी विविध मार्गानी पिकांनी पाणी देतांना दिसत आहे. सध्या आषाढ महिना असून अनेक शेतकरी वारीच्या गडबडीत दिसत आहेत. मान्सूनने राज्य व्यापले असून सध्या मुंबई, कोकणपट्ट्यासह मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसतांना दिसत आहे.
मागील वर्षी जूनअखेर जिल्ह्यात सरासरीच्या 176 टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा हे प्रमाण 80 टक्के दिसत आहे. उत्तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला दिसत नाही. परिणामी खरीपाच्या पेरण्या अथवा पेरणी झालेल्या पिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता असून यामुळे पावसाळ्यात शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
नद्यांमधील विसर्ग
रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत भिमा नदीतून 10 हजार 198 क्युसेक, गोदावरी नदी – नांदूरमध्यमेश्वर 10 हजार 958 क्युसेक, घोड नदी- 3 हजार क्युसेक, सीना नदी 157 क्युसेक विसर्ग सुरू होता.
जूनअखेर झालेला पाऊस
नगर 70.8 टक्के, पारनेर 115.7 टक्के, श्रीगोंदा 90.2 टक्के, कर्जत 73.7 टक्के, जामखेड 59. 5 टक्के, शेवगाव 68.7 टक्के, पाथर्डी 46.6 टक्के, नेवासा 57 टक्के, राहुरी 76.7 टक्के, संगमनेर 97.5 टक्के, अकोले 140 टक्के, कोपरगाव 67.5 टक्के, श्रीरामपूर 53.4 टक्के, राहाता 67.5 टक्के असा जिल्ह्यात 89.7 टक्के पावसाची नोंद झालेली आहे.





