अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाश्चात्य देशांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण 8 स्त्रियांमागे एक असे असून भारतामध्ये 22 स्त्रियांमध्ये एक असे आहे. अलीकडील काळात आपल्या देशातही त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारतात दरवर्षी 2 लाखांहून अधिक स्त्रियांना स्तनाच्या कॅन्सरची लागण होत असते. त्यामुळे पुरूषांमध्ये तंबाखू सेवनाविरोधात महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरबाबत जागरूकता करणे आवश्यक असल्याचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सतिष सोनवणे यांनी सांगितले.
भारतीय महिलांमध्ये वाढत्या स्तन कॅन्सरविषयक समस्यांबाबत सांगतांना डॉ. सोनवणे म्हणाले, स्तनांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास विशेषतः जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांमध्ये झालेला स्तनांचा कर्करोग (आई, बहीण, मावशी) असतो. महिलेच्या एका स्तनामध्ये कर्करोगाचा प्रादूर्भाव हा दुसर्या स्तनाच्या कर्करोगासाठी संभाव्य धोका असतो. स्तनाचा फायब्रोसिस्टिक रोग स्तनांमध्ये सूज येणे व अतिशय तीव्र वेदना होणे, तसेच अतिशय लहान वयात आलेली मासिक पाळी, तीस वर्षानंतर पहिले गरोदरपण, अपत्य नसणे, शिशूला स्तनपान न करणे, उशिरा रजोनिवृत्ती (पाळी संपणे), खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, त्याचप्रमाणे मद्य, चरबीयुक्त व स्निग्ध पदार्थांचे अतिसेवन, लठ्ठपणा, संप्रेरकांचा वापर (हार्मोन थेरपी) ही स्तन कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत. योग्य वेळेवर निदान झाल्यास व अचूक औषधोपचार घेतल्यास स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकतो.
लक्षणे आणि उपचार
स्तनात किंवा काखेमध्ये गाठ किंवा जाडसरपणा, स्तनातून रक्तस्त्राव होणे, स्तनाग्रास भेगा किंवा खळी पडणे, स्तनाग्र आत खेचले जाणे ही प्रमुख लक्षणे आहेत. या शस्त्रक्रियेमध्ये पूर्ण स्तन काढले जात नाही. फक्त कॅन्सर बाधीत भाग व लसीकग्रंथी काढल्या जातात. काही शस्त्रक्रियेमध्ये पूर्ण स्तन काढले जाते.
शस्त्रक्रिया आणि स्तनांची पुनर्रचना
सलाईन किंवा सिलीकॉन इम्प्लान्टच्या सहाय्याने स्तनांची पुनर्रचना करण्यास उपयोग होतो. स्तन काढून टाकल्यानंतर पाठीच्या किंवा पोटाच्या स्नायुंचा उपयोग करुन स्तनांची पुनर्रचना केली जाते.
स्वत:च करू शकतात परीक्षण
स्तन कॅन्सरच्या परीक्षणासाठी योग्य वेळ म्हणजे मासिक पाळीनंतर 3-4 दिवस. जर मासिक पाळी नियमित नसेल किंवा जर अधुनमधुन पाळी चुकत असेल तर ही परीक्षा दर महिन्याला एका ठराविक दिवशी करावी. वयाच्या 20 वर्षानंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या स्तनातील गाठ अथवा इतर कोणत्याही स्वरुपातील बदलाबद्दल जागरुक राहिले पाहिजे. यात आरशासमोर उभे राहून तुमच्या स्तनाकडे पहा कुठल्याही प्रकारे आकारातील बदल, कोणत्याही प्रकारचा त्वचेमधील बदल ओळखा. दोन्ही हात सरळ वर करुन दोन स्तनांमधील आकारात बदल जाणवल्यास पूर्ण स्तनाची योग्य पद्धतीने चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे.
कॅन्सरच्या उपाचारानंतर कॅन्सर तज्ञांकडून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. पहिले दोन वर्ष दर तीन महिन्यांनी, पुढील तीन वर्ष दर 6 महिन्यांनी आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे त्यात्या वेळी डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार घेतल्यास स्तनाच्या कॅन्सर मधून महिला मुक्त होऊ शकतात.
– डॉ. सतिष सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ.





