अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दरवर्षी सव्वा लाख भारतीय महिलांमध्ये गर्भाशयमुखाचा कॅन्सर आढळतो. यापैकी निदान न झाल्याने व योग्य उपचार न घेतल्यामुळे 50 हजार स्त्रीया या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. महिलांमध्ये याबाबत जागृती झाल्यास अनेक महिलांना जीवदान मिळू शकेल, असा विश्वास प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांनी व्यक्त केला. यामुळे महिलांनी गर्भाशयमुख कॅन्सरकडे दुर्लक्ष करणे हे जीवावर बेतणार असल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अल्पवयीन मुलींचा विवाह, लहान वयात लैंगिक संबंध, वयाच्या 20 वर्षाअगोदर पहिली गर्भधारणा, तीनपेक्षा अधिक वेळा गर्भधारणा किंवा दोन गर्भधारणांमध्ये कमी अंतर (यामुळे गर्भाशयमुखाला वारंवार इजा होते व ती जखम भरण्यास अवधी मिळत नाही) यामुळे या कॅन्सरचा धोका वाढतो. यासह गुप्तांगाची अस्वच्छता, तंबाखूची व्यसनाधिनता, गुप्तरोग विशेषतः (ह्युमन पॅपीलोमा व्हायरस), विषाणूची लागण, गर्भाशयमुखाच्या कॅन्सरची लक्षणे आहेत. दोन मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव, लैंगिक संबंधानंतर रक्तस्त्राव, पाळी बंद झाल्यानंतर (रजोनिवृत्तीनंतर) होणारा रक्तस्त्राव, अनियमित आणि अतिरिक्त स्त्राव, असाधारण थकवा, अशक्तपणा, वजन कमी होणे, ही कॅन्सरची लक्षणे आहे.
अशी करता येते चाचणी
पॅप टेस्ट चाचणी अगदी सोपी व वेदनारहित आहे. कापसाचा बोळा किंवा ब्रशच्या सहाय्याने गर्भाशयमुखातील पेशी काचपट्टीवर घेऊन सुक्ष्मदर्शकाखाली तपासल्या जातात. वयाच्या तीशीनंतर पॅप टेस्ट करुन घेणे. लग्नाचे वय 18 वर्षांपुढे असावे. त्यामुळे पहिल्या लैंगिक संबंधालाही पुढे ढकलता येईल. कुटूंब नियोजनाचा उपयोग करुन पहिल्या मुलाचा जन्म वयाच्या 20 वर्षांनंतर होईल याची खबरदारी घ्यावी. वारंवार गर्भधारणा टाळाव्यात. लैंगिक संबंधाच्यावेळी निरोधाचा वापर केल्यास गुप्तरोगांपासून सुरक्षा मिळेल व दोन मुलांमध्येही अंतर ठेवता येईल. एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळणे. तंबाखूचे सेवन टाळणे.
लसीकरण आणि उपचार
गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये, म्हणुन लसीकरणाची आधुनिक पध्दती विकसित झाली आहे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा मुख्यतः ह्युमन पॅपीलोमा व्हायरस या विषाणुमुळे होतो. दर दहा स्त्रियांपैकी आठ स्त्रियांना याचा संसर्ग त्यांच्या आयुष्यभरात होऊ शकतो. गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे निदान बहुतांशी स्त्रियांमध्ये वयाच्या 35 ते 55 मध्ये होते, परंतु त्यांच्यामध्ये कझत चा संसर्ग हा तारुण्यामध्येच झालेला असतो. अनेक स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सरची कोणतीही लक्षणे सुरुवातीच्या काळात दिसत नाहीत. अनेक स्त्रियांमध्ये हा आजार गंभीर अवस्थेत गेल्यानंतरच कळतो. या लसीकरणाचा लाभ वय वर्षे 9 ते 45 वयोगटातील मुली व महिला घेऊ शकतात. पोट उघडून गर्भाशयाची पिशवी, पॅरामेट्रियम, योनी मार्गाचा काही भाग व लसिका ग्रंथी शस्त्रक्रिया करून काढण्यात येते. यासाठी पोट उघडून शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया केली जाते. आजाराचे प्रमाण जास्त असल्यास किमोथेरपी व रेडिएशनचाही विचार केला जातो.
स्त्रियांकडून पाळली जाणारी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये झालेली जागृती यामुळे गर्भाशयमुखाच्या कॅन्सर आजाराचे प्रमाण कमी होत आहे. आपल्या देशासाठी ही अतिशय सकारात्मक बाब असली तरी स्त्रियांमध्ये याबाबतची काही लक्षणे आढळल्यास तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
– डॉ. सतिष सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ.




