Friday, February 6, 2026
Homeनगरचारचाकी वाहनाच्या धडकेत महिला ठार; संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

चारचाकी वाहनाच्या धडकेत महिला ठार; संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको

रस्त्यावरच अंत्यविधी करण्याच्या निर्णयाने प्रशासनाची धावपळ

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी खुर्द येथील गोटुंबे आखाडा येथे रविवार दि. 26 मे रोजी सायंकाळच्या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका महिलेला चारचाकी वाहन जोराची धडक देऊन पसार झाले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून संतप्त झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी काल दुपारी शनी-शिंगणापूर रस्त्यावर अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ते शनी शिंगणापूर रस्त्यावर गोटुंबे आखाडा येथे रविवार दि. 26 मे 2024 रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान गयाबाई गंगाराम तमनर, वय 42 वर्षे, या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने गयाबाई तमनर यांना जोराची धडक दिली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता त्या मयत झाल्या. काल दि. 27 मे 2024 दुपारी बारा वाजे दरम्यान त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी संतप्त झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटुंबे आखाडा येथे शिंगणापूर रस्त्यावर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रसंगी ग्रामस्थांच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्यावतीने प्रचंड आक्रोश व्यक्त करण्यात आला. शनी शिंगणापूर रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने या रस्त्यावर कायमच अपघात होतात. गोटुंबे आखाडा येथे शनी शिंगणापूर रस्त्यावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी गेल्या एक वर्षांपासून ग्रामस्थ करीत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी त्या ठिकाणी आतापर्यंत 10 ते 12 जणांचा रस्ता अपघातात बळी गेला.

YouTube video player

त्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गयाबाई तमनर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन रास्तारोको आंदोलन करून प्रशासकीय अधिकार्‍यांना धारेवर धरले. दोन दिवसांत गतीरोधक बसविण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. दोन दिवसांत गतिरोधक न झाल्यास जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून काढू, असा इशारा यावेळी ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला. याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर गयाबाई तमनर यांचा अंत्यविधी गोटुंबे आखाडा येथील स्मशानभूमीत करण्यात आला.

यावेळी ज्ञानेश्वर बाचकर, अण्णासाहेब बाचकर, गणेश रहाणे, भरत पवार, दीपक लांबे, नंदुभाऊ हरिश्चंद्रे, दशरथ बोरकर, सुभाष शेटे, सुनील तनपुरे, दीपक पटारे, उमेश बाचकर, बबन बाचकर, रावसाहेब होडगर, रामदास नेटके, रवींद्र चौधरी, किरण तांबे, लक्ष्मण खेमनर, बापू पिसाळ, बाळू दाभाडे, गेणुभाऊ तोडमल, भागवत शेडगे, कृष्णा मुंडलीक, निलेश बिडगर, तबाजी बाचकर, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

महापौरपदी

Nashik News: मोठी बातमी! नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर पदी...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६) निवडणूक पार पडली असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कुंभनगरीच्या १७ व्या महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके...